नाशिक: मागील आठवड्यात निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले. यामध्ये मका पीकाचे सर्वाधिक नुकसान झाले. अरबी समुद्रात उठलेल्या निसर्ग चक्रीवादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असतांनाच उत्तर महाराष्ट्राजवळून गेलेल्या चक्रीवादळाचा उद्रेक जिल्ह्यात झाला नसला तरी या चक्रीवादळच्या प्रभावामुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांना वादळीवाऱ्याचा फटका बसल्याने शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले. वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाच्या आधिकाऱ्यांनी केले असून प्राथमिक अहवालानुसानर ५१५ हेक्टरवरील पीकाचे नुकसान झाले असून मका, ऊस आणि फळपीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा नाशिक, सिन्नर, निफाड आणि इगतपुरी तालुक्यांतील गावांना बसला सिन्नरमधील २३ गावांमध्ये पावसाने चांगलेच नुकसान केले. या तालुक्यातील ४६० शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले. भरवशाचे मका पीक वाया गेले आहे. नाशिक तालुक्यातील २४ गावांमधील २३८ शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले आहे. मालेगाव, सटाणा, नांदवाग, इगतपुरी, निफाड, चांदवड या तालुक्यांमध्ये देखील काही प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील ७७६ शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला यामध्ये सर्वाधिक सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्या खोलाखाल नाशिक तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. मका, ऊस आणि भाजीपाला तसेच फळपीकांचे या पावसाने नुकसान केले आहे. जिल्ह्यातील एकुण स्थितीजिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांचे चक्रीवादळ आणि पावसाने नुकसान केले आहे. ७७६ शेतकऱ्यांच्या एकुण ५१५हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मका-२५६.६०, ऊस- ३१.६०, भाजीपाला- १४०.५०, फळपीके-४६.७० हेक्टर याप्रमाणे पीकांचे नुकसान झालेले आहे.
जिल्ह्यातील ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान ; निसर्ग चक्रीवादळाचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2020 6:22 PM
निसर्ग चक्रीवादाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना बसला. या शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसनीनंतर करण्यात पंचनाम्याच्या प्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्दे ९१ गावांमधील ७७६ शेतकऱ्यांना फटकाप्राथमिक अहवालानुसार ५१५ हेक्टरवरील पीकांचे नुकसाननाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकरी अडचणीत