द्याने : परिसरात दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पंधरा मिनिटे पाऊस व गारपीट झाली. अंबासन येथे वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. परिसरातील फोपीर, सारदे, आखतवाडे, द्याने, उत्राणे, खामलोण, आसखेडा, राजपूरपांडे, नामपूर अंबासन मोराणे, काकडगाव आदि भागात गारांसह पाऊस झाला. अंबासन फाटा परिसराला निंबाच्या आकाराच्या गारांसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. यामुळे शशिकांत कोर यांच्या शेतातील तीन एकर कांद्याचे नुकसान झाले. तसेच हेमंत फकीरा कोर, अजय कोर, अनील भामरे, रवींद्र कोर, दिलीप कोर आदि शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले. गारपिटीमुळे हरभरा, डाळिंब, शेवगा, गहू, टमाटा आदि पिकांचे नुकसान झाले आहे. नामपूर शिवारातील गट नं ३०१ शेतकरी समाधान भामरे यांच्या दोन एकर टमाटा पिकाचे नुकसान झाले असून, लाखोंचा फटका बसला आहे. दुष्काळी परिस्थिती बघता अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. कृषी सहायक आर. आर. पवार यांनी नुकसानीची पाहणी केली असून, राकेश भामरे यांच्या डाळींबबागाचेही नुकसान झाले. तसेच कांदा, हरभरा, गहू पिकाचे नुकसान झाले. (वार्ताहर)
द्यानेसह परिसरात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान
By admin | Published: March 02, 2016 11:00 PM