हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार, जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी पंचनामे करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासन आणि कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील ६०८९.०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वाधिक नुकसान हे सटाणा तालुक्यात झाले आहे. तालुक्यात २७३३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसामुळे २८२ गावे प्रभावित झाली आहेत. या गावांमधील एकूण १०,१७० शेतकऱ्यांच्या ६०८९.०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये ४०९३.९० हेक्टरवरील बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. तर ५३ हेक्टरवरील वार्षिक फळ पिकांना फटका बसला. १९४२.१५ हेक्टरवरील बहुवार्षिक फळपिकेदेखील बाधित झाली आहेत. नांदगाव, देवळा, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी वगळत उर्वरित तालुक्यांमधील , कांदा, हरभरा, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. तर डाळिंब आणि द्राक्ष पिकांचेदेखील नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे प्राथमिक पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत.
--इन्फो--
अवकाळीचा सर्वाधिक फटका सटाणा तालुक्याला बसला असून, येथील ३९११ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. निफाड तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या १८९५ इतकी आहे तर मालेगावमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या १५६० इतकी आहे. चांदवडमधील ७११ इतके शेतकरी प्रभावित झाले आहेत. सटाणा तालुक्यात नुकसान अधिक असले तरी जिल्ह्यात निफाडमधील सर्वाधिक ९० गावे बाधित झाले आहेत. त्याखालोखाल दिंडोरी, सिन्नर तालुक्यातील गावांची संख्या आहे.
--इन्फो--
बाधित गावे:२८२
शेतकरी: १०,१७०
बागायत क्षेत्र:४०९३.९० हेक्टर
वार्षिक फळपिके: ५३ हेक्टर
बहुवार्षिक फळपिके: १९४२.१५ हेक्टर