जळगाव नेऊर : राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी येवला तालुक्यातील जळगाव नेऊर शिवारास भेट देऊन पीक पाहणी केली. शेतकरी कैलास सोनवणे यांच्या शेतातील मका, कपाशी, सोयाबीन पिकांचा आढावा घेतला.यावेळी नाशिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ, निफाडचे उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ उपस्थित होते. याप्रसंगी डवले यांनी मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीची आजची परिस्थिती याविषयी मका पिकांची निरीक्षणे कसे घ्यावी याबाबत माहिती दिली. तसेच कीड नियंत्रण कसे करावे, याविषयी शेतकऱ्यांशी चर्चा केली. खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी कोरोनाचे संकट असूनही कृषी विभागाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन कीड नियंत्रणाविषयी जनजागृती केल्यामुळे यावर्षी मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रणात ठेवण्यात यश मिळवल्याचे तालुका कृषी अधिकारी कारभारी नवले यांनी सांगितले. मंडल कृषी अधिकारी जनार्दन क्षीरसागर, बाळासाहेब सोनवणे, कृषी सहायक साईनाथ कालेकर, प्रकाश जवणे, राहुल जगताप, राहुल शिंदे, कानिफनाथ हुजबंद, रमेश वाडेकर, सविता तांबे आदी उपस्थित होते.