निफाड तालुक्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागतो आहे. रुई, देवगाव, धानोरे, धारणगाव, गोंदेगाव, गोळेगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस होऊन पिकांचे नुकसान झाले होते. त्यातच या परिसरामध्ये सतत पाऊस पडत असल्याने डाळिंब पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अवकाळी पावसाने नुकसान होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन घटले. मात्र याबाबत विमा कंपनीस वेळोवळी कळवूनही विमा कंपनीने पीक नुकसानीची पाहणी केली नाही. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयानेही बेदखल केले. पीक विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाईही आजपर्यंत दिलेली नाही. शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई न दिल्यास शेतकरी येत्या १ सप्टेंबरपासून चूल बंद आंदोलन करणार आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिले असून त्यावर शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पाणी वापर संस्थेचे संस्थापक चेअरमन निवृत्ती चव्हाणके, वाल्मीक ठोंबरे, सुभाष गायकवाड, सोमनाथ दरेकर, अण्णा जाधव, विलास तस्कर, बाबासाहेब गुजर, तुकाराम गायकवाड, रामनाथ तासकर, प्रकाश तासकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
इन्फो
पर्जन्यमापक यंत्र सदोष
राज्य शासनाने महसूल मंडळाच्या ठिकाणी ठेवलेली पर्जन्यमापक यंत्रे सदोष आहेत. यंत्र एका ठिकाणी तर पाऊस पडतो दुसऱ्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची नोंद होत नाही. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पर्जन्यमापक यंत्र बसवण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.