नाशिक : जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्राला बेमोसमी पावसाचा जोरदार फटका बसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार जिल्ह्याला बेमोसमी पावसाचा तडाखा बसला असून मालेगाव, बागलाण, दिंडोरी या तालुक्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे चार जनावरे दगावली तर १४ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्राथमिक माहिती शासनाला कळविण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्राच्या हवामानावर प्रतिकूल परिणाम झाला. त्यामुळे मुंबईच्या कुलाबा येथील वेधशाळेने सोमवारपासून (दि. ७) बुधवारपर्यंत उत्तर महाराष्ट्रात ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. अनेक ठिकाणी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली तर विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारादेखील पडल्या. यामुळे शेतपिकांचेही नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातही मालेगाव, बागलाण, दिंडोरी या तालुक्यांना बेमोसमी पावसाचा तडाखा बसला. शेतपिके, फळबागा व पशुधनाची हानी झाली आहे. मालेगाव तालुक्यातील करंजगव्हाण व वळवाडे येथे एक गाय व दोन बैल तर बागलाण तालुक्यातील अंबासन येथे वीज पडून एक बैल दगावला. पावसामुळे एकूण १४ हेक्टरवरील पिके आडवी झाली असून, १० हेक्टरवरील गहू व दिंडोरी तालुक्यातील ४ हेक्टरवरील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. चार गावांतील १६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
जिल्ह्याच्या अन्य भागांतही बेमोसमी पाऊस झाला. मात्र त्या ठिकाणी नुकसान झाल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे प्राथमिक पंचनामे पूर्ण करीत शासनाला माहिती सादर केली आहे. नुकसानीचा अंतिम अहवाल शासनाला सादर करून आर्थिक मदतीची मागणी केली जाणार आहे.