मनोज मालपाणी नाशिकरोडसाडेचार वर्षांपूर्वी झालेल्या मनपाच्या निवडणुकीत नाशिकरोड विभागामध्ये सहा नगरसेवक निवडून आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांमुळे या पक्षाला मोठी रसद पुरवली होती. परंतु आता या सहांपैकी चार जणांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने नाशिकरोडमध्ये मनसेचे फक्त दोन नगरसेवक राहिले आहेत. तर कॉँग्रेस, राष्ट्रवादीच्या देखील एक-एक नगरसेवकाने शिवसेना-भाजपाचा रस्ता पकडला आहे. यामुळे मनसे, कॉँग्रेस, राष्ट्रवादी यांची भविष्यातील वाटचाल अधिक खडतर झाली आहे. साडेचार वर्षांपूर्वी झालेल्या मनपाच्या निवडणुकीत नाशिकरोड विभागातून शिवसेनेचे सात- सुनीता कोठुळे, सूर्यकांत लवटे, नयना घोलप, शिवाजी सहाणे, कोमल मेहरोलिया, शैलेश ढगे, मंगला आढाव; मनसेचे सहा- हेमंत गोडसे, रमेश धोंगडे, संगीता गायकवाड, अशोक सातभाई, संपत शेलार, शोभना शिंदे; भाजपाचे दोन- संभाजी मोरूस्कर, सविता दलवाणी; रिपाइं आठवले गट दोन- सुनील वाघ, ललिता भालेराव; राष्ट्रवादी चार- हरिष भडांगे, शोभा आवारे, रंजना बोराडे, वैशाली दाणी; कॉँग्रेसचे दोन- कन्हैया साळवे, वैशाली भागवत; अपक्ष- पवन पवार असे २४ नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीत शिवसेना-रिपाइं आठवले गटाची युती होती. प्रभाग ६१ मधून निवडून आलेले मनसेचे हेमंत गोडसे यांनी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मनसेशी काडीमोड घेत शिवबंधन बांधले. त्या ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे केशव पोरजे विजयी झाले. त्यानंतर गेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत मनसेचे संपत शेलार, शोभना शिंदे हेदेखील शिवसेनेत दाखल झाले. मनसेने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची तक्रार केल्यानंतर विभागीय आयुक्तांनी शेलार व शिंदे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय दिला. मात्र त्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. त्यानंतर काही दिवसांनी कॉँग्रेसचे कन्हैया साळवे, वैशाली भागवत यांनीदेखील शिवबंधन बांधले होते. मात्र नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या निवडणुकीत शिवसेनेने स्थायी सदस्य म्हणून न घेतल्याने साळवे, भागवत हे काही महिन्यांतच पुन्हा कॉँग्रेसवासी झाले. मनसेचे पहिले महापौर अॅड. यतिन वाघ यांच्यासोबत माजी स्थायी सभापती रमेश धोंगडे यांनी मनसेला रामराम ठोकत पुन्हा स्वगृही शिवसेनेत दाखल झाले. काही दिवसांपूर्वी जेलरोडच्या राष्ट्रवादीच्या रंजना बोराडे, माजी नगरसेवक प्रकाश बोराडे यांनीदेखील शिवबंधन बांधून घेतले. पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक राजकारण व पुढील राजकीय भविष्य लक्षात घेऊन या पक्षातून त्या पक्षात असा खो-खो चा खेळ सध्या सुरू आहे. तर शिवसेनेच्या कोमल मेहरोलिया व माजी नगरसेवक प्रताप मेहरोलिया हेदेखील शिवबंधन सोडून ‘जय श्रीराम’ म्हणत भाजपावासी झाले आहेत. तर मुंबईत दोन दिवसांपूर्वीच कॉँग्रेसचे कन्हैया साळवे यांनीदेखील भाजपामध्ये प्रवेश करून घेतला. तसे साळवे पूर्वाश्रमीचे भाजपाचेच कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांचे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर व्यापारी बॅँकेचे संचालक व मनसेचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत गायकवाड यांनीदेखील भाजपात प्रवेश केला. गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचे एकनिष्ठेने काम करणारे व नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात शिवसेनेची ताकद वाढविणारे व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाश घुगे यांनी कुरघोडीच्या राजकारणामुळे शिवसेनेतून बाहेर पडत भाजपामध्ये प्रवेश केला.जेथे सरशी... सरशी तेथे उड्या घेणारे नगरसेवक नवीन नाहीत. सध्या शिवसेना आणि भाजपाची चलती असल्याने या पक्षांमध्ये आयारामांची संख्या अधिक आहे. कॉँग्रेस-राष्ट्रवादी कोण आले अन् कोण गेलं हे गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. तर शिवसेना-भाजपा एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी सर्वांसाठी दरवाजे उघडे करून ठेवले आहेत. सर्वसामान्य नागरिक मात्र नगरसेवकांच्या पक्षीय कोलांटउड्यांनी स्तब्ध झाले आहेत.
नगरसेवकांच्या कोलांटउड्यांमुळे नागरिक स्तंभित
By admin | Published: May 24, 2016 10:21 PM