नाशिक : शहरातील सुमारे शंभर व जिल्हाभरातील साडेचारशे सार्वजनिक क्षेत्रांतील बँकांच्या जवळपास चार हजार कर्मचारी आणि अधिकाºयांनी युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने पुकारलेल्या संपात सहभाग घेतल्याने मंगळवारी (दि.२२) दिवसभरात कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली. बँकांचे विलीनीकरण, तसेच सरकारकडून बँकांना होणारा अपुरा भांडवल पुरवठा या मुद्द्यांवर यूएफबीयूने देशव्यापी संप पुकारला असून, या संपात नाशिकमधील सार्वजनिक क्षेत्रासह काही जुन्या खासगी बँकांनीही सहभाग घेतल्याने संंबंधित बँकांच्या ग्राहकांना अडचणींना सामना करावा लागला. केंद्र सरकारने भारतीय स्टेट बँके मध्ये राज्यस्तरीय बँकांचे विलीनीकरण केल्यानंतर आता अन्य बँकांच्या विलीनीकरणाच्या दिशेनेही सरकारचा विचार सुरू असून, या विरोधात युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)ने देशव्यापी संपाची हाक दिली असून, जिल्हाभरातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे कर्मचारी व अधिकारी या संपात सहभागी झाल्याने संप यशस्वी झाल्याचा दावा यूएफबीयूचे सचिव के. एफ. देशमुख यांनी केला आहे. या संपाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बँक कर्मचारी व अधिकाºयांनी बँक आॅफ महाराष्ट्रसमोर द्वारसभा घेऊन सरकारी बँकिंग धोरणाचा निषेध व्यक्त केला. शहरासह जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील विविध ४५० बँकांचे व्यवहार बंद असल्याने सुमारे सातशे ते आठशे कोटींची उलाढाल ढप्प झाली असून, यात नगदी व्यवहारांसह चेकद्वारे होणाºया व्यवहारांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका संपावर असताना खासगी क्षेत्रातील आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, अॅक्सिस आणि महिंद्र आदि बँकांचे कामकाज धनादेशांचे क्लिअरिंग वगळता नियमितपणे सुरू होते. त्यामुळे पर्यायी खाते असलेल्या अनेक ग्राहकांची गैरसोय टळली. मात्र तरीही एटीएममधून पैसे काढणाºया ग्राहकांची संख्या वाढल्याचे दिसून आले.
बँकांच्या संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:24 AM