आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेने कात टाकली असून, स्थानिक पातळीवर पक्ष बांधणीकडे मोर्चा वळविला आहे. 'पक्षाचा कणा' असलेल्या शाखा अध्यक्षांची मुलाखत घेऊन त्यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २८) माउली लॉन्स येथे मनसे नेते माजी आमदार बाळा नांदगावकर, शिरीष सावंत, अविनाश जाधव, संजय नाईक, अमेय खोपकर, आदींनी सातपूर विभागातील २० शाखा अध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मनसेत किती वर्षांपासून आणि काय काम करीत आहात ? जनसंपर्क कसा आहे ? ज्या प्रभागासाठी इच्छुक आहे त्याची माहिती, राजकारणाची आणि समाजकारणाची माहिती, राजकारणातील घडामोडींची अद्ययावत माहिती आहे का? शाखाध्यक्ष नियुक्ती झाल्यानंतर पक्षाचे काम कसे करणार ? यासह विविध प्रश्नांची उत्तरे इच्छुकांकडून जाणून घेतल्याचे समजते. सातपूर विभागातून जवळपास १०० च्यावर इच्छुक कार्यकर्त्यांनी मुलाखत दिल्याची माहिती शहर उपाध्यक्ष सचिन सिन्हा यांनी दिली.
इन्फो===
नुकताच झालेला मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा दौरा आणि युवा नेतृत्व म्हणून अमित ठाकरे यांच्याकडे आगामी मनपा निवडणुकीची देण्यात आलेली जबाबदारी याचा प्रभाव युवा कार्यकर्त्यांवर होत असल्याने शाखा अध्यक्षपदासाठी झुंबड उडत आहे. नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांची नावे शाखा अध्यक्ष पदासाठी सुचविली आहेत. त्यामुळे मुलाखतीसाठी गर्दी झाल्याचे समजते.