नाशिक : जिल्ह्यातील जातपडताळणी समितीकडे तीन ते चार महिन्यांपूर्वी अर्ज करूनही जातपडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशाची संधी हातातून जाण्याच्या भीतीने जातपडताळणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी जातपडताळणी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र शुक्रवारी (दि.१५) दिसून आले.
विविध मागास प्रवर्गांतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी जातपडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. जातपडताळणीसाठी काही विद्यार्थ्यांनी तब्बल तीन ते चार महिन्यांपासून अर्ज करूनही त्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांकडून जातपडताळणी समिती विरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. समितीकडे जवळपास दहा हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती आहे. मात्र जातपडताळणी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तब्बल वर्षाभरापूर्वीपासूनचे प्रकरणेही प्रलंबित असून, विद्यार्थ्यांना प्रदीर्घ प्रतीक्षा करूनही जातपडताळणी प्रमाणपत्र दिले जात नाही, उलट ऐनवेळी प्रकरणांमध्ये त्रुटी काढण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेशासाठी प्रमाणपत्र सादर करण्यास विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र अर्ज केल्यानंतर तीन ते चार महिन्यांनंतरही त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित राहिले होते. आता ऐनवेळी विद्यार्थ्यांच्या अर्जांमध्ये त्रुटी काढण्यात येत आहेत, तर अनेकांकडून त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही त्यांना प्रमाणपत्र मिळालेले नसल्याने विद्यार्थी जातपडताळणी कार्यालयात गर्दी करीत आहेत. त्यामुळे जातपडताळणी समिती सदस्यांना आता सायंकाळी उशिरापर्यंत प्रकरणांचा निपटारा करावा लागतो आहे.
इन्फो-१
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष
समाजकल्याण विभागाच्या जातप्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात शुक्रवारी व गुरुवारी (दि. १५) विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कोरोना परिस्थितीत ही गर्दी नियंत्रणासाठी समाजकल्याण विभागाकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे सॅनिटायझरच्या वापराकडेही दुर्लक्ष केले जात आहे. काही विद्यार्थी मास्क वापरत असले तरी अनेकांकडून मास्कच्या वापराकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
इन्फो-
ग्रामपंचायतींच्या प्रकरणांची भर
जिल्हा जातपडताळणी समितीकडे विद्यार्थ्यांचे हजारो प्रकरणे प्रलंबित असताना त्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या प्रकरणांचीही भर पडल्याने जवळपास दहा हजारांहून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातील शैक्षणिक प्रकरणांचा निपटारा करण्यात जातपडताळणी विभागातील कर्मचाऱ्याने गेल्या तीन ते चार महिन्यांत मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचे प्रमाण वाढले असून, त्यात ग्रामपंचायत निवडणुकांमुळे आणखी वाढ झाली आहे.
कोट -१
गेल्या वर्षभरापूर्वी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला असून, वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप प्रकरण निकाली काढण्यात आलेले नाही. समितीकडून जाणूनबुजून प्रकरणे प्रलंबित ठेवली जात आहे. आता ऐनवेळी प्रकरणांमध्ये त्रुटी काढली जात आहे. सगीर मन्सुरी, पालक, सटाणा.
कोट-२
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी शनिवारपर्यंत प्रमाणपत्र देण्याची मुदत आहे. समितीकडे प्रकरणे दाखल करून तीन महिने उलटले आहे. मात्र, अद्याप प्रमाणपत्र झालेला नाही. आजही मिळाले नाही तर प्रवेशास अडचण येईल. आजोबांचा दाखला दिला असतानाही आता तो जोडण्यास सांगितले जात आहे. -आदेश घुगे, विद्यार्थी, पास्ते, सिन्नर
कोट- ३
जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर करताना सर्व आवश्यक कागदपत्रं जोडली होती. मात्र आता जातीचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखलाच नसल्याचे सांगत त्रुटी काढली जात आहे. दोन महिन्यांपासून यासंबंधी कोणतीही सूचना दिलेली नाही. आता ऐनवेळी त्रुटी असल्याचे सांगितले जात आहे.
-जयेश धात्रक, विद्यार्थी, आशेवाडी. नाशिक
(फोटो - दोन प्रतिक्रियांचे फोटो आरफोटोला सेव्ह आहे)