नाशिक : इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होत असून ही गर्दी नियंत्रित करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना जॉगिंग ट्रॅकवर व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांमुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला असून अशाप्रकारे कोरोना संसर्गाच्या प्रसारास कारणीभूत ठरणारांवर कारवाईची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
--
गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक
नाशिक : सिडको परिसरात भाजी व किराणा खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून अशाप्रकारे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत आहे. पोलिसांनी एक रस्ता बंद केला तर नागरिक दुसऱ्या रस्त्याने वाहनांची वर्दळ वाढवत असल्याने गर्दी नियंत्रित करताना पोलिसांची दमछाक होत आहे.
--
अधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण
नाशिक : शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरातींचे फलक लावून विद्रुपीकरण केले जात आहे. स्मार्ट रोडवरही अशाप्रकारे पोस्टर भित्तिपत्रके लावून विद्रुपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध शिक्षण संस्था, जॉगिंग ट्रॅक, ग्रीम जीम परिसरात अशाप्रकारे परवानगीशिवाय फलक लावून विद्रुपीकरण केले जात आहे.
--
प्रतिबंधित क्षेत्राचे फलक हटविण्याचे प्रकार
नाशिक -शहरात विविध ठिकाणी विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या इमारतींना लावण्यात आलेले प्रतिबंधित क्षेत्राचे फलक काढून फेकण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात नियम पाळले जात नसल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशा प्रकारच्या प्रतिबंधित क्षेत्रावर करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
--
कॅरम, चेसबोर्डवरची धूळ झटकली
नाशिक - कोरोनाकाळात संचारबंदीमुळे घराघरात कॅरम आणि बुद्धिबळाचे खेळ रंगल्याचे दिसून येत होते, परंतु शहरातील रुग्ण संख्या घटल्याने न्यू नॉर्मलच्या ओघात पुन्हा या साहित्यावर धूळ चढली होती. मात्र, पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने घराघरातील कॅरम व चेसबोर्डवरची धूळ झटकली आहे. सध्या ऑनलाइन शिक्षण बंद असून पालकांचेही वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने पुन्हा कॅरम आणि बुद्धिबळाचे खेळ रंगत आहेत.