नाशिक: कोरोनापासून काहीसा दिलासा मिळाल्यानंतर जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होताच नाशिककर घराबाहेर पडल्याने शहरातील रस्त्यांवर सकाळपासूनच मोठी गर्दी झाली. बाजारपेठेत खरेदीसाठी वर्दळ वाढली तर रस्त्यांवर वाहनांची कोंडी देखील झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. शहरातील प्रमुख बाजारपेठांबरोबरच इतर उपनगरांमधील रस्त्यांवर गर्दी उसळली होती.
जिल्ह्यातील कोराेना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मंगळवार (दि.१) पासून व्यवहार खुले करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे निर्धारित वेळेत खरेदी उरकण्यासाठी बाजारपेठेत झुंबड झाली. जिल्ह्यातील व्यवहार सुरू झाल्यामुळे व्यापारी, व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी बाजारातील तुडुंब गर्दीमुळे प्रशासनाला मात्र कोरोना वाढण्याची चिंता लागली आहे.
शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मेनरोड, रविवार कारंजा तसेच भद्रकाली मार्केटमध्ये सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ दिसून आली. भद्रकाली मार्केटमध्ये पावसाळी कामांसाठी लागणारे साहित्य खरेदी करणाऱ्यांची गर्दी झाली होती तर रविवार कारंजा येथील किराणा बाजारात सकाळपासूनच गर्दी झाली होती. महात्मा गांधी रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर शालिमार येथील जुन्या तिबेटीयन मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी झाली होती.
दहीपुलावर रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने नागरिकांनी अंतर्गत रस्त्याचा वापर केला; मात्र तेथेही दुचाकी शिरल्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरही कोंडी झाल्याचे दिसून आले. अशोकस्तंभ परिसरातही गजबज वाढली. कानडे मारुती लेनही ग्राहकांच्या गर्दीने ओसंडून वाहिला. गंगापूररोड, शरणपूररोड तसेच काॅलेजरोडवरील देखील पुन्हा एकदा वाहनांची वर्दळ झाली. सुसाट वेगाने फिरणाऱ्या तरुणांची भर यात पडली.
--इन्फो--
निर्बंध नियमांकडे दुर्लक्ष
कोणते व्यवसाय सुरू राहणार आणि कोणते ई-कॉमर्स पद्धतीने याबाबतची स्पष्टता देण्यात आलेली असली तरी त्याला न जुमानताही अनेक दुकाने सुरू करण्यात आली. दुसरीकडे एकल दुकानांची संकल्पना स्पष्ट असतानाही शहरातील बाजारपेठेतील दुकाने सुरू झाली. मद्य दुकाने, खाद्यपदार्थ, हॉटेल्स, ढाबा केवळ पार्सल सुविधेला परवानगी असताना मंगळवारी ही दुकाने सुरू करण्यात आली.
--इन्फो--
येथे लोटली गर्दी
नाशिकरोड: बिटको चौक, देवीचौक, रेजिमेंटल प्लाझा, वास्को चौक, जुने बिटको रुग्णालय मार्ग, जेलरोड, सैलानीबाबा चौक, शिवाजी चौक, भीमनगर आदी.
इंदिरानगर: साईनाथनगर, पांडवनगरी बसथांबा, रथचक्र चौक, पाथर्डी फाटा, वडाळागावातील खंडोबा चौक, आलीशान सोसायटी रस्ता.
सातपूर: सातपूरला विशेष गर्दी झाली नाही मात्र अशोकनगर भाजी मार्केट, सातपूर कॉलनी भाजी मार्केटमध्ये काही प्रमाणात गर्दी झाली.
--इन्फो-
केवळ २०० रुग्ण आणि पुन्हा निर्बंध
निर्बंध शिथिल होताच नागरिकांचे लोंढेच रस्त्यावर आल्याने बाजारपेठेत सर्वत्र गर्दी झाली. रस्त्यावर सर्वत्र झालेली गर्दी पाहता येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांची संख्या वाढली तर जिल्ह्यात पुन्हा पहिल्या सारखेच निर्बंध लावावे लागतील अशी चिंता जिल्हा प्रशासनाला वाटत आहे. दहा टक्क्याखाली पॉझिटिव्हिटी रेट असल्याने नाशिक जिल्ह्यातील व्यवहार सुरू होऊ शकले. पॉझिटिव्हिटी रेट १० टक्के होण्यास फक्त २०० रुग्ण दररोजचा फरक आहे. रुग्णसंख्या २०० ने वाढली तर पुृढील शुक्रवारपासून पुन्हा अनलॉक करण्याची वेळ येते की काय अशी भीती जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
-- इन्फो--
मेनरोडवर लागले सेल
गेल्या वीस दिवसांपासून दुकाने सुरू असल्याने दुकानदारांकडे नवीन माल नसला तरी असलेला माल विक्री करण्यासाठी अनेक दुकानदारांनी सेल सुरू केल्यामुळे देखील गर्दीत अधिकच भर पडली. पावसाळ्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा देखील सेल लागला होता. त्यामुळे अशा दुकानांवर गर्दी झाल्याचे दिसून आले. स्वस्त दरात शालेय साहित्य मिळत असल्याने ग्राहकांची झुंबड उडाली.