त्र्यंबकेश्वर : दीपावली व सलग असलेल्या सुट्यांमुळे भाविकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केली आहे. झटपट दर्शन घेण्याकरिता असलेल्या २०० रुपये तिकिटाच्या योजनेतून दर्शनालाही किमान दोन तास लागत होते. यावरून गर्दीची कल्पना येते.गेल्या आठवड्यापासून दीपावलीची धामधूम सुरू होती. या काळात त्र्यंबकेश्वरला गर्दी रोडावली होती. भाविक येत होते, पण नेहमीच्या तुलनेत म्हणावी अशी गर्दी नव्हती. सुट्यांमुळे सध्या प्रचंड गर्दी होत आहे. गावातील हॉटेल, प्रसाद, वाण, भेटवस्तू, देवाच्या मूर्ती आदी व्यावसायिकांच्या दुकानातदेखील गर्दी दिसत आहे. सध्या पूर्व दरवाजाने दर्शनव्यवस्था सुरू आहे. या ठिकाणी भव्य मंडप (उन्हाळी शामियाना) देवस्थान ट्रस्टने उभारला आहे. सध्या सर्व रांगा फुल्ल होत आहेत. सोमवारी भगवान त्र्यंबकराजाची पालखी निघणार असल्याने गर्दी असतेच.त्र्यंबकेश्वर मंदिरासह कुशावर्त तीर्थ, निवृत्तिनाथ मंदिर, गंगाद्वार, ब्रह्मगिरी पर्वत आदी ठिकाणी भाविकांची गर्दी असते. त्यामुळे गाइड, रिक्षाचालक आदींचे व्यवसाय बहरले आहेत.दरम्यान, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेभाविकांची दर्शनव्यवस्था नियोजनबद्ध केल्याने भाविकांना शांततेत दर्शन घेता येते. सध्या तरी मंदिरात भांडणे, हाणामारीच्या घटना पाहण्यात आलेल्या नाहीत.