पंचवटी : सर्वपित्री अमावास्येला पितरांचे श्राद्ध आणि पिंड दान करण्यासाठी बुधवारी सकाळपासून रामकुंड येथे स्थानिक तसेच परजिल्ह्यातील भाविकांची गर्दी झाली होती. पितृ पक्षातील सर्वपित्री अमावास्येला कुटुंबातील दिवंगत पितरांची तिथी माहिती नसते. तसेच ज्या व्यक्तींचा अपघाती मृत्यू झालेला असतो अशा पितरांना सर्वपित्रीला अमावास्याच्या दिवशी पिंड दान करण्याची प्रथा आहे. सर्वपित्री अमावास्येला शेकडो भाविक रामकुंडावर पिंड दान आणि काक घास ठेवण्यासाठी गर्दी करतात.
बुधवारच्या दिवशी मुंबईसह विविध जिल्ह्यातील तसेच काही परराज्यातील भाविकांनी सकाळपासून गोद घाटावर रामकुंड येथे मोठी गर्दी केली होती. पिंड दान आणि श्राद्ध विधी करण्यासाठी आलेले भाविक मुंडन करून रामकुंडात स्नान करत पिंड दान करत होते. त्यानंतर रामकुंडावर असलेल्या काक घास ठेवण्याच्या जागेवर काक घास ठेवून काकस्पर्श होण्याची भाविक प्रतीक्षा करीत होते. बहुतांशी भाविकांनी पूजेनंतर काकस्पर्शासाठी घास पंचवटी अमरधाम नजीक दाट झाडी झुडपात ठेवत होते.
गोदावरीला पाण्याची पातळी कमी झाल्याने जागा मोकळी मिळाली होती तसेच अहिल्याराम व्यायामशाळा मागील पटांगणात पिंड दान पूजन सुरू होते. भाविक मोठ्या संख्येने रामकुंडात दाखल होत असल्याने रामकुंड परिसरात मिळेल त्याठिकाणी रस्त्याच्या कडेला चार चाकी वाहने उभी केली जात होती एकीकडे बुधवारचा आठवडे बाजार तर दुसरीकडे सर्वपित्री अमावास्या यामुळे गंगा घाट परिसरात बुधवारच्या दिवशी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले.