सप्तशृंगगड : दिवाळी पाडव्याचा मुहूर्त व दिवाळी सुटीची पर्वणी साधत भाविकांनी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये व बॅँकांना सलग चार-पाच दिवस सुटी असल्याने सप्तशृंगगडाला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. फ्यूनिक्युलर ट्रॉलीचा आनंद घेण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, मुंबईसह गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक या ठिकाणच्या भाविकांचा महापूर पहावयास मिळत आहे.प्रत्येक भाविक फ्यूनिक्युलर ट्रॉलीमध्ये बसून दर्शनाला जात आहे. त्यामुळे येथे लांबच लांब रांगा पहावयास मिळत आहे. मात्र प्रशासनाकडून फ्यूनिक्युलर ट्रॉलीसाठी कुठल्याही प्रकारचे नियोजन नसल्याने नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. ट्रॉलीचे तिकीट काढण्यासाठी भाविकांना भर उन्हात दोन दोन तास उभे राहावे लागत आहे. तिकीटघर येथे सावलीची वा निवारा शेड नसल्याने भाविकांना चक्कर येणे, पोटात मळमळणे असा त्रास होत आहे. त्यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे.
सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 4:33 PM