पंचवटी : नाताळ सणाच्या सुट्ट्या तसेच वीकेंडमुळे अनेक शासकीय, निमशासकीय तसेच खासगी नोकरदार वर्षअखेर आनंदात जावे यासाठी सुट्ट्या टाकून देवदर्शनासाठी बाहेर पडले असून, पंचवटीत गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी वाढली आहे. थंडी कमी झाल्यामुळे शेकडोच्या संख्येने परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील भाविक देवदर्शनासाठी दाखल झाल्याने देव-देवतांचीमंदिरे भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहेत.वर्ष समाप्तीला आठवड्याचा कालावधी शिल्लक असल्याने त्यातच नाताळ सणाच्या सुट्ट्या पर्यटक तसेच भाविकांसाठी पर्वणी ठरली आहे. काही दिवसांपासून पसरलेल्या कडाक्याच्या थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरल्याने भाविक नाशिकला पसंती देत आहेत.गोदाघाटासह संगमावर भाविकांची गर्दीपंचवटी परिसरात दैनंदिन शेकडो भाविक देवदर्शनासाठी दाखल होत असल्याने श्री काळाराम मंदिर, सीतागुंफा, कपालेश्वर, रामकुंड परिसर तपोवन, गंगाघाट भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहे. त्यामुळे पंचवटी परिसरात वाहनांचीदेखील गर्दी आहे. भाविकांच्या गर्दीमुळे परिसरातील विविध व्यावसायिकांचे व्यवसाय तेजीत आले आहेत. पंचवटीतील रस्ते सकाळच्या सुमारास भाविकांच्या पदयात्रेने फुलून जात असल्याचे दिसून येते. देवदर्शनासाठी येणारे भाविक भाजीबाजार पटांगण, महापालिका वाहनतळ तसेच राममंदिर बाहेर असलेल्या रस्त्यावर चारचाकी वाहने उभी करत असल्याने परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पर्यटक व भाविकांची गर्दी पाहता परिसरातील हॉटेल, लॉजेसदेखील फुल्ल झाले आहेत. याशिवाय गाइड, रिक्षाचालक, हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस प्राप्त झाले आहेत.
सुट्यांमुळे पंचवटीत पर्यटकांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:28 AM