लखमापूर : जिल्ह्यातील पर्यटनस्थळ परीसरात पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असताना हे सर्व आदेश,नियम धाब्यावर बसवून असंख्य नागरीक शनिवार, रविवारी सुट्यांमुळे कोणतीही खबरदारी न घेता जीवाची मौज करण्याकरीता धरण, धबधबे, किल्ले टेकड्या आदी प्रेक्षणीय स्थळांकडे धावल्याने अश्या भागात पर्यटकांचा महापूर उसळला होता. त्यामुळे प्रशासन, पोलिस यंत्रणा देखिल हतबल झाल्याचे चित्र दिसत होते.
दिंडोरी तालुक्यातील किल्ले रामशेज किल्ला परीसरात शनिवारी व रविवारी पर्यटकांची बेसुमार गर्दी दिसून आली. अनेकजण या ठिकाणी मनमुराद भटकत असल्याने त्यानंतर वनविभाग दिंडोरी, पोलीस यंत्रणा व स्थानिक गावाचे दुर्लक्ष असल्याने किल्ल्यावर बेसुमार प्लास्टिक कचऱ्याचे ढीग झाले आहेत. बेशिस्त पर्यटक व हुल्लडबाज, व्यसनी, उपद्रवी मंडळींमुळे कोरोना काळात मोठ्या कष्टाने दुर्गसंवर्धनातून वाचवलेल्या ऐतिहासिक वास्तूंना, येथील पर्यावरणाला धोका पोहोचवला जात आहे.या संदर्भात वनविभाग, पोलीस, गाव प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधितांकडून हलगर्जीपणा, दुर्लक्ष केल जात आहे. दरम्यान एकीकडे दुर्गांचे अस्तित्व वाचवण्यासाठी दुर्गसंवर्धन संस्था जीवापाड राबतात, मात्र त्याच दुर्गांचे उरलेसुरले अस्तित्व संपवण्याचे प्रकार डोळ्यासमोर घडत आहे. हयाबाबत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था, पर्यावरण टास्क फोर्स च्यावतीने पुन्हा पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे गडप्रेमींनी सांगितले. कोरोनाच्या स्थितीत किल्ल्यावर होणारी गर्दी, गावाला संसर्ग पोहोचवणारी आहे. किल्ल्यावर बेसुमार प्लास्टिक कचरा वाढला आहे, यासंदर्भात उपवनसंरक्षक पूर्व वनविभाग, दिंडोरी वनविभाग, जिल्हा पोलीस प्रशासन अंतर्गत दिंडोरी पोलीस, स्थानिक गाव यांनी कोरोनाच्या स्थितीत पर्यटन संदर्भात शासकीय आदेश पाळावा व किल्ल्याचे अस्तित्व वाचवण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्याशी नोंदणी, तपासणी चौकी उभारावी अशी मागणी दुर्गप्रेमींकडून करण्यात आली आहे.पर्यटन बंदी असताना....रामशेज किल्ल्यावर पर्यटकांना जाण्यास मनाई असताना देखील वनविभाग व स्थानिक ग्रामपंचायत यांची भूमिका संशयास्पद दिसते. आशेवाडी ग्रामपंचायतीने येणाऱ्या पर्यटकांकडून वाहनतळाच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली सुरू ठेवली असून यातून मोठी आर्थिक उलाढाल होत आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन बंदी केलेली असताना आशेवाडी ग्रामपंचायतीने जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. संबंधित पार्किंग ठेकेदार पर्यटकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पार्किंग चार्ज वसूल करीत आहेत. त्याची चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे.चाकट...नियम फक्त कागदावरच...रामशेज किल्ल्यावर होणारी पर्यटकांची गर्दी बघता पर्यटन बंदी कागदावरच दिसून येत आहे. बेशिस्त पर्यटकांमुळे किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्थानिक ग्रामपंचायत व वनविभागाकडून पर्यटकांना कुठलाही अटकाव केला जात नाही. बेशिस्त पर्यटक व हुल्लडबाजी यामुळे गडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याठिकाणी तपासणी चौकी भरण्यात यावी. (२७ लखमापूर १,२,३)