नाशिक : संपूर्णनाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला महापूर आल्याने गोदावरीचा रौद्रावतार बघण्यासाठी शेकडो नागरिकांनी पंचवटी कारंजा ते होळकर पुलावर तोबा गर्दी केल्याने लोकांचा महापूर जणू होळकर पूलावर पहावयास मिळाला. वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण झाली. पंचवटी कारंजा मालेगाव स्टॅन्ड पर्यंत शंभर ते दीडशे मीटर अंतर कापण्यासाठी दुचाकी वाहन धारकांना तब्बल दहा ते पंधरा मिनिटांचा कालावधी लागत आहे. शेकडोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासन देखील हतबल झाले होते.पोलीस प्रशासनाने गर्दीवर नियंत्रण मिळावे यासाठी संपूर्ण शहरात जमावबंदी आदेश (कलम-१४४) लागू केला; मात्र हा आदेश कागदावरच असल्याचे दिसून आले. देखील बेशिस्त नागरिकांनी कोणतीही दाद न देता एक प्रकारे नाशिक पोलिस प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखिवली. गोदावरीला आलेला पूर बघण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केल्याने संपूर्ण मालेगाव स्टँड परिसराला सिंहस्थ कुंभमेळा महापर्वणी स्वरूप प्राप्त झाले होते. शेकडो आबालवृद्धांनी होळकर पुलाकडे धाव घेतल्याने एरवी वाहतुकीच्या वर्दळीने फुलणारा रस्ता रविवारी (दि.4) नागरिकांच्या गर्दीने भरगच्च झाल्याचे दिसून आले.
नागरिकांनी धोक्याच्या ठिकाणी मोबाईल मध्ये सेल्फी काढू नये अशा सूचना पोलिस प्रशासनाकडून दिल्या जात असल्या तरी अतिउत्साही नागरिक होळकर पुलावर उभे राहून सेल्फी घेण्यात मग्न होते. यात युवक युवती महिलांचा मोठा सहभाग होता. होळकर पुलावर जाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली होती.होळकर पुलापासून नागरिकांनी इंद्रकुंड पंचवटी सार्वजनिक वाचनालय, मालेगाव स्टँड उतार, शिनचौक, सरदार चौक कपालेश्वर येथिल अंबिकाचौक या ठिकाणी दुपारी प्रचंड गर्दी केली होती.