नाशिक : शहरात आज, शनिवारी व उद्या, रविवारी सर्वच व्यवसाय बंद राहणार असल्याने शुक्रवारी शहरातील विविध भागांत भाजी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. सिडको, सातपूर, इंदिरानगर ,उपनगर, नाशिकरोड, जेलरोडसारख्या उपनगरांमध्येही हीच परिस्थिती दिसून आली. अनेकांनी दुपारच्या वेळी गर्दी कमी असताना आवश्यक भाज्यांची खरेदी केली.
--
विद्यार्थ्यांचा ऑनलाईन शिक्षणावर भर
नाशिक : पहिली ते आठवीसह नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द करून या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्यात आले आहे. मात्र दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास करताना शाळांचे ऑनलाईन वर्ग व खासगी क्लासच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे.
--
बोर्डाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी
नाशिक : कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी व बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या विविध घटकांमधून होत आहे. शिक्षण विभागाने यापूर्वी अकरावीसह पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
--
मास्कला मागणी वाढली
नाशिक - कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे मास्कची मागणी वाढली आहे. शहरात विविध प्रकारची दुकाने व व्यवसाय बंद असले तरी मास्कविक्रेत्यांची दुकाने मात्र सुरू असून, मास्कविक्रेत्यांनी नागरिकांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन विविध आकारांचे व रंगांचे मास्क विक्रीसाठी उपलब्ध केले आहेत.