दिंडोरी/नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील औद्योगिक वसाहतीत महाशिवरात्रीनिमित्त गोंदे दुमाला व नांदूरवैद्य तसेच दिंडोरी परिसरातील मंदिरे ‘बम बम भोले, हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदूमून गेली होती.येथील सर्वच शिवमंदिरांमध्ये सकाळपासून भाविकांची दर्शनासाठी व पूजेसाठी गर्दी पाहावयास मिळाली. महाशिवरात्र असल्यामुळे भाविकांनी महादेव मंदिरात मनोभावे हजेरी लावून शिवपिंडीवर श्रीफळ व बेलाची पाने अर्पण करून दर्शन घेतले. गोंदे दुमाला परिसरात औद्योगिक वसाहत असल्याने येथे नेहमीच वर्दळ असते. येथील कामगार व महिला कामगारांनी जवळच असलेल्या महादेव मंदिरांमध्ये सकाळपासून दर्शनासाठी रांग लावली होती. सोमवार हा देवांचा देव महादेव यांचा वार म्हणून ओळखला जातो. सोमवार करणाऱ्यांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय असते. यानिमित्त त्याला बेलाची पाने वाहण्यास भाविक प्राधान्य देतात. परिसरातील अनेक शिवमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना साबुदाणा खिचडी व केळी महाप्रसाद म्हणून वाटण्यात आला. परिसरातील अनेक ठिकाणी भजन, कीर्तन, शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण केले जात आहे. रात्रीच्या वेळीदेखील भजन गायन, तसेच संगीतमय कथा आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन महादेवाच्या मंदिरांमध्ये केले होते.भाविकांना फराळ वाटपघोटी : इगतपुरीच्या पूर्व भागात असलेल्या गोंदे दुमाला, नांदूरवैद्य, बेलगाव कुºहे येथील असलेल्या महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी पहाटेपासून गर्दी केली होती. विविध ठिकाणी भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटपदेखील करण्यात येत होते. कार्यक्र माची सुरुवात नांदूरवैद्य येथील महादेव मंदिरात असलेल्या महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक व महापूजा करून करण्यात आली. या परिसरात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. बेल, फुले, पाने वाहून शिवशंकराचे दर्शन भाविक घेत होते. त्याचप्रमाणे अनेक शिवमंदिरांमध्ये दुग्धाभिषेक करण्यात येत होता.