नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत असला तरी आणखी वेगाने रुग्ण कमी व्हावेत यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १२ तारखेपासून २३ तारखेच्या रात्री १२ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांना केवळ वैद्यकीय कारणास्तवच बाहेर पडता येणार असून, किराणा दुकाने १२ वाजेपर्यंत सुरू राहणार असली तरी घरपोच माध्यमातून तो ग्राहकांना मिळणार आहे. वैद्यकीय कारणास्तवच बाहेर पडता येेणार असल्याने भाजीपाला आणि अन्य साहित्य मिळण्याविषयी संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे मंगळवारी (दि. ११) सकाळपासून बाजारपेेठांमध्ये झुंबड उडाली. अनेक ठिकाणी तर वाहतूककोंडीदेखील झाली.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण बंद होते. त्यातच कोविशिल्ड लसदेखील येत नव्हती. सोमवारी रात्री नऊ हजार डोस मिळाल्याने महापालिकेने २६ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले होते. त्यामुळे अनेक केंद्रांवर पहाटेपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी नंबर लावून ठेवले होते. दसक आणि सातपूर येथे ज्येष्ठ नागरिक आणि कर्मचारी तसेच काही राजकीय कार्यकर्त्यांचे वाद झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला तर अन्य अनेक ठिकाणी गर्दी बघून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.