रस्ते व्यवस्थित बुजविले नसल्याने अपघात
नाशिक : विविध कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी शहरातील बहुसंख्य रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. काम झाल्यानंतर हे खड्डे व्यवस्थित बुजविले जात नसल्याने रस्ता वर खाली होऊन दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वीज पुरवठा खंडित होण्याच्या तक्रारी
नाशिक : पावसाळा सुरू होण्यापूर्वीच अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वाहतूक कोंडीमुळे चालणे मुश्कील
नाशिक : अनेक रस्त्यांवर झालेल्या खोदकामामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असून या ठिकाणाहून चालणेही मुश्कील बनले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणाहून मार्गक्रमण करणे जिकिरीचे होते. काही ठिकाणी सुरक्षिततेसाठी बॅरिकेट्स्ही लावलेले नाहीत.
आरोग्य कर्मचाऱ्यांना दिलासा
नाशिक : कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळे खासगी आणि शासकीय आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आला होता. अनेकांना रजा मिळणेही मुश्कील बनले होते.
बंदमुळे अनेक उद्यानांत अस्वच्छता
नाशिक : गेल्या दीड वर्षापासून उद्याने बंद असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. काही ठिकाणी खेळण्यांची मोडतोड झाली आहे. उद्यानांची स्वच्छता करून खेळण्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
नाशिक : पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे अनेक वस्तूंचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर शेतीच्या मशागतीचे दरही वाढले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. खरीप हंगामासाठी तयारी करताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
नाशिक : द्वारका चौकात अवजड वाहनांची वर्दळ वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. या ठिकाणी असलेल्या सिग्नलकडेही अनेकांचे दुर्लक्ष होते. या ठिकाणी असलेले वाहतूक पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.