नाशिक : मनपासह जिल्ह्याला बुधवारी ३२ हजार लसींचा साठा प्राप्त झाला होता. त्यातील नऊ हजार लस नाशिक शहरात, तर उर्वरित लस ग्रामीण क्षेत्राला मिळाल्या. मात्र, काही केंद्रांवर लस पोहोचण्यास उशीर झाल्याने काही केंद्रांवर लसीकरणासाठी झुंबड, तर काही केंद्रांवर उशिरापर्यंत लसच उपलब्ध नसल्याने शेकडो नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले.
नाशिक शहरात तर सकाळी सहा-सात वाजेपासूनच नागरिकांनी इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूरचे इएसआयसी रुग्णालय, मनपाच्या सिन्नर फाट्यावरील रुग्णालयासमोर रांगा लावल्या होत्या. मात्र, काही केंद्रांवर लस उशिरा पोहाेचल्याने तिथून नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागले, तर काही केंद्रांवर केवळ ज्या नागरिकांनी पहिली लस घेतली होती, त्या नागरिकांनाच लस देण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने पहिली लस घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला, तर काही केंद्रांवर शेकडो नागरिक नाव नोंदवून रांगेत उभे असताना केवळ पहिल्या शंभर जणांना डोस देऊन लसीकरण थांबविण्यात आल्याने अन्य नागरिकांनाही लसींविना परतावे लागले. सिन्नर फाटा येथील मनपाच्या रुग्णालयाबाहेर तर लस घेण्यास आलेल्या नागरिकांपैकी केवळ ७० जणांच्या हातावर क्रमांक टाकून त्यांनाच लस मिळू शकणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, गुरुवारी कोव्हॅक्सिन लसींचा १६ हजार लसींचा साठादेखील उपलब्ध होणार आहे. त्याचे वितरण शुक्रवारी करण्यात येणार असल्याने या लसी शनिवारपासूनच उपलब्ध होऊ शकणार आहेत.
इन्फो
नाशिकला प्राप्त झालेल्या ३२ हजारपैकी नऊ हजार लसी शहराला मिळाल्या असल्या तरी शहरातील बहुतांश केंद्रांवर त्या तत्काळ संपुष्टात आल्या. त्यामुळे पुन्हा गुरुवारी केवळ मोजक्याच तीन ते चार केंद्रांवर लसीकरण केले जाणार आहे, तर जिल्ह्याला प्राप्त झालेल्या २३ हजार लसींमुळे जिल्ह्यातदेखील अनेक केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. मात्र, तिथेदेखील पुरेसा साठा प्राप्त झालेला नसल्याने अनेक नागरिकांना लसीविना परतावे लागले.