सुरक्षित अंतराचा ग्राहकांना विसर
नाशिक : लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने नागरिकांकडून बाजारपेठेत गर्दी केली जात आहे. जीवनाश्यक सेवा वगळता लाॅकडाऊन लागू केला जातो, असा मागील वर्षीचा अनुभव असतानाही नागरिक बाजारात गर्दी करीत असून, सुरक्षित अंतराकडे दुर्लक्ष करीत आहेत.
प्रधानपार्कमध्ये शटर बंद : दुकाने सुरू
नाशिक : शहरातील सर्वांत मोठे मोबाइल मार्केट असलेल्या प्रधानपार्कमध्ये दुकानांचे शटर बंद असले तरी बंद शटरआडून मोबाइल ॲक्सेसरीजची दुकाने सुरू असल्याने दुकानांबाहेर गर्दी दिसत आहे. या दुकानांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने बंद शटरआड व्यवसाय सुरू असल्याचे दिसते.
झेंडूच्या फुलांचे वाढले दर
नाशिक : यंदा झालेल्या बेमोसमी पावसामुळे झेंडू फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. लागवड कमी झाल्याने बाजारात झेंडुचे फुलेदेखील कमी प्रमाणात असल्यामुळे गुढीपाडव्याला फुलांचे दर वाढलेले दिसून आले. दरवर्षी गुढीपाडव्याला बहरणारा झेंडू यंदा कोमजला आहे.
रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करावी
नाशिक : कोरोना संसर्गाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. मध्यंतरी महापालिकेने अशा अनेक बेशिस्तांविरुद्ध कारवाई सुरू केली होती; परंतु आता यंत्रणेवर कोरोनाचा ताण वाढला असल्याने थुंकणाऱ्यांविरुद्धची कारवाई मागे पडली आहे. या प्रकारची कारवाई पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
मंडप, डेकोरेटर्स, व्यावसायिक अडचणीत
नाशिक : यंदा लग्नसराईचा काळ जवळ येताच कोरोना वाढल्यामुळे लग्नसोहळ्यांवर निर्बंध आले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका मंडप, डेकोरेटर्स व्यावसायिकांना बसला आहे. अनेकांच्या ऑर्डर्स रद्द झाल्याने ॲडव्हान्ससाठी तगादा लावला जात आहे, तर ज्यांचे बुकिंग झाले होते त्यांनी ते रद्द केल्यामुळे व्यावसायिक अधिक संकटात सापडले आहेत.
रक्त संकलन आटल्याने अडचण
नाशिक : शहरातील रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा आटल्यामुळे अनेक रुग्णांना रक्त मिळेनासे झाले आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांकडून सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना शिबिरासाठी आवाहन करण्याची वेळ आली आहे. उन्हाळ्यात रक्तसंकलन कमी होत असल्याचा अनुभव आहेच. शिवाय कोरोनाचादेखील फटका बसला आहे.