नाशिक : कोरोनामुळे मंदीच्या चक्रात रुतू पाहणारी अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने बांधकाम क्षेत्रातील खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवरील मुद्रांक शुल्कात दिलेल्या सवलतीची मुदत बुधवारी (दि. ३१) संपुष्टात येणार असल्याने खरेदी-विक्रेचे व्यावहार करणाऱ्या अनेक नागरिकांनी मंगळवारी (दि.३०) उपनिबंधक कार्यालयांमध्ये गर्दी करून दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. तर अकेकांनी या सवलतीचा लाभ घेण्यासाठी शुल्काची रक्कम आगाऊ अदा करून पुढील १२० दिवसांत दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी घेतली.
बांधकाम व्यावसायाला बूस्ट देण्यासाठी सरकाने ३१ डिसेंबरपर्यंत तीन टक्के सवलत दिली होती. मात्र ३१ डिसेंबरनंतर यात एक टक्क्याने कपात करून ३१ मार्चपर्यंत दोन टक्के सवलत देण्यात आली होती. आता ३१ मार्चला ही सवलत संपुष्टात येणार आहे. त्यामुळे अखेरच्या आठवड्यात उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी रांगा लागत असतानाच मंगळवारी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नाशिक जिल्ह्यातील सात उपनिबंधक कार्यालयांमध्ये दस्तनोंदणी करण्यासाठी ग्राहकांची रीघ असल्याचे दिसून आले. यात शहरातील प्रमुख कार्यालयांमध्ये गर्दी अधिक होती. दरम्यान, ३१ मार्चपूर्वी नाेंदणी शुल्क आगाऊ भरून पुढील चार महिन्यांत दस्तनाेंदणी प्रक्रिया पूर्ण करीत, सध्या सुरू असलेल्या दोन टक्के मुद्रांक शुल्कातील सवलतीचा लाभ घेता येणार असल्याने, अनेक ग्राहकांचा मुद्रांक शुल्क भरण्याकडे कल दिसून आला.