नाशिक : राज्य परिवहन कार्यालय परिसरातील विविध व्यावसायीकांकडून वाहनचालकांची लूट केली जात असल्याची तक्रार येथे पासिंगसाठी येणाऱ्या वाहनचालकांकडून केली जात आहे. या परिसरात अनेक वस्तूंचे दर अव्वाच्या सव्वा आकारले जात असल्याने वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.
दिंडोरी रोडवर वाहतुकीस अडथळा
नाशिक : दिंडोरी रोडवर दिवसेंदिवस वाढत असलेल्या विक्रेत्यांच्या संख्येमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागला आहे. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. रस्त्यावर दुकान मांडणाऱ्या विक्रेत्यांमुळे काही ठिकाणी रस्ता अरुंद झाला आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
हुल्लडबाजांवर कारवाईची गरज
नाशिक : परिसरातील ग्रामीण भागातील परिसर हिरवाईने नटला असून, या परिसरात फिरायला येणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्या वाढली आहे. मखमलाबाद परिसर, गंगापूर धरण परिसरात गर्दी होऊ लागल्याचे चित्र पहायला मिळत आहे. काही नागरिक निसर्गाचा आनंद घेत असले तरी काही जण हुल्लडबाजी करताना दिसतात. अशा हुल्लडबाजांना आवर घालावा, अशी मागणी होत आहे.
पोलिसांच्या कारवाईने अनेकांचे ढाबे दणाणले
नाशिक : नायलॉन मांजा विक्रेत्यांवर पोलिसांकडून कारवाई होऊ लागल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. चोरी छुपे नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कारवाई करून त्यांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. नागरिकांनी आपल्या मुलांना नायलॉन मांजा घेऊन देऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
अवैध धंद्यांवर कारवाईची मागणी
नाशिक : अंबड , सिडको परिसरात अवैध धंदे वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. अवैध धंद्यांमुळे परिसरातील गुन्हेगारीत वाढ होऊ लागली आहे. अवैध धंद्यांच्या स्पर्धेतून वैमनस्य वाढत असल्याने पोलिसांनी परिसरातील अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.
औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांवर खड्डे
नाशिक : सातपूर औद्योगिक वसाहतीमधील काही रस्त्यांची दुरवस्था झाली असून, यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिसरात सकाळ-संध्याकाळ कामगारांची वर्दळ असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे कामगारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. रस्त्यांवर काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांची डागडुजी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.