नाशिकरोड : प्लॅस्टिकबंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून, नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. नाशिकरोडमधील एका व्यापाºयाने चक्क चिल्लरमध्ये दंड भरल्याने चिल्लर मोजता-मोजता अधिकाºयांची चांगलीच दमछाक झाली.‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मकरंद अनासपुरे याच्या चित्रपटाची यानिमित्ताने सर्वांना आठवण झाली. या चित्रपटातील निवडणुकीची अनामत रक्कम चिल्लरमध्ये भरतानाचे दृश्य चांगलेच गाजले होते. या दृश्याची कॉपी करत अनेक उमेदवारांनी अशा प्रकारे चिल्लरमध्ये निवडणुकीची अनामत रक्कम भरल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. नाशिकरोडच्या व्यापाºयाने त्याही पुढे जात दंडाची सुमारे दहा हजारांची रक्कम चिल्लरमध्ये भरल्याने सध्या हा विषय चर्चिला जात आहे. सुभाषरोड येथील हिरा वाइन्स या दुकानात मनपा अधिकाºयांनी प्लॅस्टिक पिशव्या जप्त करून दुकानदारावर दहा हजार रुपये दंडाची कारवाई केली. दुकानदाराने दंडाची रक्कम भरताना आपल्याजवळील सर्व चिल्लर अधिकाºयांपुढे ओतली आणि दंडाची ही रक्कम मोजून घेताना अधिकाºयांचा चांगलाच घाम निघाला. शहरामध्ये यापूर्वी एका उमेदवाराने चिल्लरमध्ये अनामत रक्कम भरल्याने संबंधित उमेदवार चांगलाच चर्चेत आला होता, असेच काहीसे या व्यापाºयाच्या बाबतीतही घडले आहे. दंड भरून हा व्यापारी चिल्लरमुळे चर्चेत आला आहे.