नाशिक : कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेत भारतीय कंपनी सचिव संस्थेच्या (आयसीएसआय) पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार दिनांक १ ते १० जून २०२१ या कालावधीत होणाऱ्या सीएस अभ्यासक्रमाच्या सर्वप्रकारच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सीएस फाऊंडेशन, सीएस एक्झिक्युटिव्ह नवीन आणि जुना अभ्यासक्रम आणि सीएस प्रोफेशनल (नवीन आणि जुना अभ्यासक्रम) या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या असून, या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक यथावकाश प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती आयसीसीएसच्या नाशिक शाखेतर्फे देण्यात आली आहे.
कोरोना संसर्गाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सरकारी निर्देशांचे पालन करून या परीक्षेच्या नवीन तारखा घोषित केल्या जाणार असून, परीक्षांचे नवीन सुधारित वेळापत्रक लवकरच आयसीएसआयच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे. परीक्षा सुरु होण्याच्या किमान ३० दिवसांपूर्वी या संदर्भातील सूचना संकेतस्थळावर दिली जाणार असल्याचे आयसीएसआयतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे तसेच परीक्षेसंदर्भात कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असे आवाहन आयसीएसआयतर्फे करण्यात आले आहे.