नाशिक : गोदापात्रात दिवसेंदिवस वाढणाऱ्या पानवेलींमुळे शहरात क्युलेक्स नावाच्या डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका मुख्यालयात याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून पानवेली काढण्यासाठी आरोग्य विभागाने घनकचरा विभागाला साकडे घातले आहे.
काही दिवसांपूर्वी सिन्नर तालुक्यातील दातली येथील एका महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला होता तर शहरातदेखील तीन रुग्ण आढळले होते. त्याची टांगती तलवार असताना शहरात गोदावरीमुळे ज्या पानवेली वाढल्या आहेत त्यामुळे शहरात क्युलेक्स डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संपूर्ण शहरातून मनपा मुख्यालयात तक्रारी वाढत असून पानवेली काढण्यासाठी आरोग्य विभागाने घनकचरा विभागाला साकडे घातले आहे.
महापालिका हद्दीमध्ये गोदावरी, वालदेवी आणि नंदिनी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पानवेली वाढल्या आहेत. नदीपात्रात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अनेक ठिकाणी नदीपात्रामधे नागरिकांनी जुने कपड्यांसह विविध टाकाऊ वस्तू टाकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पानवेलीचे प्रमाण वाढल्याचे दिसते. यामुळे क्युलेक्स डासांची घनता वाढल्याने नदीकाठावरील नागरिक त्रस्त झाले आहेत. या पानवेली काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी पत्रामध्ये करण्यात आली आहे.
गोदावरीत वाढते प्रदूषणगोदापात्रातील वाढत्या पानवेलींमुळे प्रदूषणात भर पडली आहे. शहरातील सांडपाणी तसेच औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी गोदावरी नदीमध्ये मिसळत असल्याने प्रदूषण वाढत आहे. प्रदूषणामुळे गोदावरीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात पानवेली पसरत आहे. त्याचा परिणाम गोदावरी नदीकाठालगत असलेल्या नाशिक शहरातील नळपाणी पुरवठा योजनांवरदेखील होत आहे. पानवेली काढण्याच्या नावाने मनपाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला आहे. त्यासाठी विविध यंत्रे खरेदी करण्यात आली.