नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार चालतो, बिल्डरांचे दलालच हा विभाग चालवितात, प्लॅन मंजुरीसाठी बिल्डरकडून २०० वार जागा मागण्यात आली, असे अनेक गंभीर आरोप बुधवारी पालिकेच्या महासभेत करण्यात आले. यावेळी नगररचना विभागाचे सहायक संचालक विजय शेंडे यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव फेटाळत त्यांना मूळ सेवेत परत पाठविण्याचा ठराव करण्यात आला.शेंडे यांच्या प्रतिनियुक्तीवरून नगररचना विभागावर ही वादळी चर्चा झाली. शाहू खैरे यांनी नगररचना विभागातील अधिकारी उन्मत्त असून, सर्वाधिक भ्रष्टाचार याच विभागात चालत असल्याचा आरोप केला. प्रा. कविता कर्डक यांनी आपल्या परिचित विकासकाने वडाळा शिवारात बांधकाम परवानगी मागितली तेव्हा त्यास टाळाटाळ करण्यात आली. नंतर या विकासकाकडून दोनशे वार जागा पालिकेच्या अधिकाऱ्याने मागितली असल्याचे सांगितले. त्याच वेळी अन्य नगरसेवकांनी तक्रारी करतानाच सहायक संचालक शेंडे यांच्या कारभाराविषयी तक्रारी करण्यात आल्या. त्यांनी स्वत:च्या अधिकारात दोन दिवस नगररचना विभाग बंद ठेवला. तसेच मनमानी पद्धतीने नियम लावून विकासकांना वेठीस धरले जाते, मराठीत टिप्पण्या लिहिण्यास सांगितले जाते, असे आरोप करताना काझीची गढी धोकादायक झाल्यानंतर त्यासंदर्भात गढीवर बोलावल्यानंतरदेखील त्यांनी आपल्या कर्तव्यात नमूद नसल्याचे सांगून टाळले होते. पूररेषेत असलेल्या गावठाणातील बांधकामांना परवानगी देण्याच्या महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्यास तेच अडथळा निर्माण करतील, असे मत नगरसेवकांनी व्यक्त केले. पालिकेत परसेवेतील अधिकारी नियुक्त झाल्यानंतरचा अनुभव चांगला नसल्याने त्यांच्या नियुक्तीस विरोध करण्यात आला आणि स्थानिक सेवेतील अधिकाऱ्यांकडेच ही जबाबदारी असावी, अशीही मागणी करण्यात आल्याने महापौर अॅड. वाघ यांनी त्यानुसार स्थानिक अधिकाऱ्याकडेच जबाबदारी द्यावी, अशा सूचना केल्या. चर्चेत संदीप लेनकर, दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, अशोक सातभाई, गुरुमित बग्गा, अशोक मुर्तडक, उत्तमराव कांबळे, शशिकांत जाधव, संजय चव्हाण यांनी भाग घेतला. (प्रतिनिधी)