शुक्रवारी (दि.१०) रात्री जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज इमारतीच्या बंद गाळ्याबाहेर संशयित लंगड्याने सुनीलबरोबर असलेल्या काही जोडीदारांकडे दारू पिण्यासाठी २० रुपये मागितले होते. त्यावेळी सुनीलने मध्यस्थी केल्याच्या कारणावरून दोघांत झटापट होऊन लंगड्याने धारदार कटरने गळ्यावर वार केला. त्यात सुनील गंभीर जखमी झाल्याने जीव वाचविण्यासाठी तो जुना आडगाव नाका, वाघाडीतून सेवाकुंज रस्त्याकडे जखमी अवस्थेत पळत गेला. मात्र अतिरक्त स्त्राव झाल्याने रस्त्यात तो बेशुद्धावस्थेत पडला. ही माहिती कळविण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला.
या घटनेतील मयत व्यक्ती कोण व त्याचा मारेकरी कोण याचा शोध घेत असताना पोलिसांनी सुनीलबरोबर असलेल्या बिगेश सुगम नायर, मोनू श्यामलाल बनसोड उर्फ सागरबाबा या दोघा जणांना ताब्यात घेत चौकशी केली असता रात्री सुनील, मोनू बनसोड व नायर असे तिघे बसलेले असताना संशयित लंगड्या त्या ठिकाणी आला त्याने सागरबाबाकडे दारू पिण्यासाठी २० रुपये मागितले. मात्र बाबाने पैसे देण्यास नकार देताच लंगड्या वाद घालू लागला. त्यावेळी सुनीलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता दोघांत झटापट होऊन लंगड्याने सुनीलच्या गळ्यावर धारदार कटरने वार करून पलायन केले. रात्री उशिरा पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती घेऊन सहाय्यक पोलीस आयुक्त मधुकर गावीत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, हवालदार शेखर फरताळे, राकेश शिंदे, विलास चारोस्कर, दीपक नाईक यासह पोलिसांनी राम मंदिर, परिसर गंगाघाट गणेशवाडी, भाजीबाजार तपोवनात संशयितांचा शोध सुरू केला. पोलीस तपोवनात गेले असता मिळालेल्या वर्णनाचा संशयित पोलिसांना बघून लपत असल्याचे दिसून येताच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.
या खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पंडित रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्या यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे त्याच्याविरुद्ध गंगापूर तसेच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.