सिन्नर : शहरानजीक व तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांचे शेतशिवार विविध प्रकारच्या फुलांनी सजल्याने रस्त्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे लक्षवेधून घेत आहे. दसरा, दिवाळी या सणांसाठी विविध फुलांना ग्राहकांची मोठी मागणी असल्याने शेतकरी व्यापारी तत्वावर शेतीकडे वळल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे. नवरात्रोत्सवापासून सुगीचे दिवस सुरु झाले की या दिवसात विविध फुले फूलू लागतात. निसर्गानेच जणू धरणीमातेला ही देणगी दिली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांसाठी विविध प्रकाराच्या फुलांची माळ घालण्याची परंपराही आजतागायत सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खुरसणीच्या फुलांपासून मखमली झेंडुच्या फुलांना बाजारात चांगली मागणी असते. त्यामुळे अनेक शेतकरी ग्राहकांची आस पुरविण्यासाठी या फुल पिकांची लागवड करतात. शेतशिवारासह डोंगरमाथ्यांवरही विविध रान- फुलांचे मननोहक ताटवे प्रवाशी व पर्यटकांचे चित्तार्षकन करणारे ठरतात. त्यामुळे शेतशिवाराने व रानमळ््यांनी जणू पिवळ््या-नारंगी रंगाची सरमिसळ असलेला शालू परिधान केल्याचा भास पहाणाऱ्याला होतोे. झेंडूसह चमेली, शेवंती या फुलांनीही मळे फुलले असून तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शिवारांमध्ये फुलांचा मंद सुगंधात भाताच्या साळीचा सुगंध दरवळल्याने आल्हाददायक अनुभूती देणारा ठरत आहे. तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील डुबेरेपासून पासून ते पांढुर्लीपर्यंतच्या तसेच ठाणगाव परिसरातील अनेक गावांच्या शिवारात तर उत्तरेकडील नायगाव, जोगलटेंभी या भागातील शेतकरी गेल्या काही वर्षांपासून शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती मोठ्या प्रमाणात करु लागले आहेत. नायगाव परिसरातील शेती कडवा कालयाच्या सिंचन लाभ क्षेत्रात येत असल्याने या भागात शेतीसिंचनाची सोय झाल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध आहे. तसेच गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या जोगलटेंभी परिसरातही मुबलक प्रमाणात शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचा विविध भाजीपाला वर्गीय पिकांबरोबर विविध रंगाची व विविध प्रकारची फुले पिकविण्यावर भर असतो. टमाटे, कांद्याच्या दरात नेहमी चढउतार होत असतो. तसेच त्याला औषधे, खते व मजुरीचा खर्चही अतिरिक्त करावा लागतो. मात्र फुलशेतीतून शेतकऱ्यांच्या खिशात पैसा खुळखुळू लागल्याने अनेक जण आता फुल शेतीकडे वळू लागले आहेत.गेल्या वर्षी झेंडूला चांगला भाव मिळाला होता. यंदाही चांगला भाव मिळण्याची अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. (वार्ताहर)
शेतशिवार विविध प्रकारच्या फुलांनी सजल्याने
By admin | Published: October 11, 2014 12:32 AM