खामखेडा : परिसरामघ्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून रिमझिम पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने लाल कांद्याच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाण्याअभावी लाल कांद्याची लागवडही खोळंबली आहे.खामखेडा परिसरात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. कांदा या पिकाकडे नगदी पिक म्हणून पाहिले जाते. परंतु या वर्षी अजूनही विहिरींना पाणी न उतरल्यामुळे लाल कांद्याची लागवड कशी करावी असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. सुरुवातीला समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी अल्पशा पावसावर मका, बाजरी, भूईमग,ज्वारी आदि पिकांची पेरणी केली होती. दीड महिन्यांपासून या परिसरामध्ये पावसाने दडी मारल्याने पिके पाण्याअभावी करपू लागली होती. त्यामुळे शेतकरी चिंतातुर झाला होता. अखेर गेल्या काही दिवसांपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पिकांना जीवदान मिळले असले तरी विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ न झाल्याने पेरणीचे धारिष्टय शेतक-यांनी केलेले नाही. काही शेतक-यांकडे महागडे पोळ कांद्याचे बियाणे घरामध्ये पडून आहे. दरवर्षी पोळ कांद्याचे बियाणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टाकले जाते. पोळ कांद्याची लागवड साधारण आॅगस्ट महिन्यापासून होऊन तो आॅक्टोबरपर्यंत बाजारात येतो. परंतु, यंदा जुलै संपला तरी अद्याप विहिरींना पाणी नसल्याने लाल कांद्याची लागवड खोळंबली आहे. असाच रिमझिम पाऊस पडत राहिला तर कांदा लागवड होणार नाही. परिणामी, लाल कांद्याच्या उत्पादनात घाट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लाल कांद्याची लागवड खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2019 4:05 PM
पाण्याचा अभाव : क्षेत्रात घट होण्याची शक्यता
ठळक मुद्देपोळ कांद्याची लागवड साधारण आॅगस्ट महिन्यापासून होऊन तो आॅक्टोबरपर्यंत बाजारात येतो. परंतु, यंदा जुलै संपला तरी अद्याप विहिरींना पाणी नसल्याने लाल कांद्याची लागवड खोळंबली आहे.