नाशिक : गेल्या आठवड्यात केंद्र स्तरावर झालेल्या आदिवासी कला, सांस्कृतिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या राज्यातील ८० आदिवासी विद्यार्थ्यांची निवड देहरादून येथील राष्ट्रीय उत्सवात झाली असून या स्पर्धेत हे विद्यार्थी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यामध्ये चार शिक्षकांचादेखील सहभाग आहे. ऑक्टोबरमध्ये उत्तराखंड येथील देहरादून येथे या स्पर्धा होणार आहे.
आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळ अभ्यासक्रम असणाऱ्या ३७ एकलव्य मॉडेल निवासी शाळा चालवल्या जातात. या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कलाकौशल्याला वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले जाते. गेल्या २८ आणि २९ रोजी अजमेर सौंदाणे या एकलव्य मॉडेल निवासी शाळेत दोन दिवसीय राज्यस्तरीय सांस्कृतिक, साहित्य आणि कला उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवाचे उद्घाटन नाशिकचे अपर आयुक्त संदीप गोलाईत, कळवण प्रकल्प अधिकारी विशाल नरवाडे यांच्या हस्ते झाले. सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रजनीकांत चिलमुला यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. एकलव्य मॉडेल निवासी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश देवरे आणि त्यांच्या पूर्ण समितीने राज्यस्तरीय महोत्सवाचे नियोजन केले होते. दोन दिवसीय कार्यक्रमदरम्यान आमदार दिलीप बोरसे, १३ प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी, उपसंचालक (वित्त) हितेश विसपुते, सहायक प्रकल्प अधिकारी अजिंक्य औचरे तसेच एकलव्य कक्षामधील कलाथीनाथन, सुचेता लासुरे, अमृता भालेराव, काजल झाल्टे, शिवा वाघ, गणेश गोटे यांनी महोत्सवाला भेट दिली.
सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अशा दोन गटात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाने विजयी झालेले एकूण ८० आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि ४ शिक्षक राष्ट्रीय उत्सवात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.