नाशिक : मविप्रच्या वतीने जिल्ह्यातील विविध प्राथमिक-माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सांस्कृतिक महोत्सवामध्ये सादरीकरण केले होते. यामध्ये समूहनृत्य, समूहगीत, वैयक्तिक वाद्यवादन, एकपात्री प्रयोग या गटांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी पार्श्वगायक सायली पंकज यांनी विविध हिंदी-मराठी गीतांचे गायन करून विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली.गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित सांस्कृतिक महोत्सव बक्षीस वितरण सोहळ्याप्रसंगी विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पार्श्वगायक सायली पंकज या उपस्थित होत्या. तसेच सरचिटणीस नीलिमा पवार, कृष्णाजी भगत, मुरलीधर पाटील, भाऊसाहेब खातळे, नाना महाले आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रत्येक गटातील सर्वप्रथम आलेल्या स्पर्धकांनी कलागुणांचे सादरीकरण केले. यावेळी दिंडोरीच्या जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आम्ही महान बनवू देशास आपुल्या..., हे समूहगीत सादर केले. मखमलाबाद येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी माझा भारत देश गुणीजनांचा थोर मनांचा शांतीचा संदेश... या गीताचे स्वरबद्ध गायन केले. तसेच वैयक्तिक वाद्यवादनात ऋ षिकेश कदम या न्यू मराठा हायस्कूलच्या विद्यार्थ्याने उत्कृ ष्टरीत्या संबळ हे वाद्य वाजविण्याची कला सादर केली तसेच डुबेरे गावाच्या जनता विद्यालयाच्या विद्यार्थिनीने ‘मुलगी वाचवा देश वाचवा’ असा संदेश एकपात्री प्रयोगातून दिला, तर सायखेड्याच्या जनता इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थिनीने ‘शेतकऱ्यांची आत्महत्त्ये’वर भाष्य करणाऱ्या एकपात्री प्रयोग सादर केला. अभिनव बाल विकास मंदिर उत्तमनगरच्या विद्यार्थिनींनी आम्ही धनगर-धनगर हे तर गोरेराम लेनमधील बाल शिक्षण मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाई मी जोगवा-जोगवा मागते... या गीतावर समूहनृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. (प्रतिनिधी)
सांस्कृतिक महोत्सवाचे बक्षीस वितरण
By admin | Published: December 28, 2015 11:51 PM