--------
नाशिकरोड विभागातील जेलरोड परिसरात नाशिक मनपाच्या वतीने प्रलंबित असलेल्या नाट्यगृह उभारणीस नवीन वर्षात प्रारंभ होणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून साडेपाच कोटी तर मुख्यमंत्री निधीतून दीड कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, या परिसरातील वृक्षांबाबत वृक्षप्रेमींनी आक्षेप घेतल्यामुळे तांत्रिक स्तरावर हा प्रकल्प रखडला होता. मात्र, आता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यानंतर वृक्षतोडीला परवानगी मिळाल्याने नूतन वर्षात नाट्यगृह उभारणीच्या कामाला प्रारंभ होऊ शकणार आहे.
-----------------
पलुस्कर नाट्यगृह नवीन रंगरुपात
पंचवटीतील पं. पलुस्कर नाट्यगृहाचे प्रलंबित राहिलेले नूतनीकरणाचे काम येत्या मे महिन्यापर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे वर्षाच्या मध्यापासून हे सभागृह नाट्यरसिकांसाठी पुन्हा खुले होऊ शकणार आहे. या नूतनीकरणांतर्गत संपूर्ण सभागृह एसी होणार असून नवीन ॲकॉस्टीक उभारणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय मेकअप रुम, गेस्ट रुमचे नूतनीकरण, आधुनिक बैठकव्यवस्था असे संपूर्ण सभागृहाचे रुपडेच पालटले जाणार आहे. त्यासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याने आता नूतन वर्षात काम लवकरच पूर्ण होऊ शकणार आहे.
----------------
वेबसिरीज, मालिकावाल्यांना नाशिकची ओढ
लॉकडाऊनच्या काळात आरोग्यदायक हवा आणि सर्वप्रकारची लोकेशन्स उपलब्ध असल्याने वेबसिरीज आणि मालिका निर्मात्यांना नाशिकची ओढ लागण्यास प्रारंभ झाला. मावळत्या वर्षाच्या अनुभवातून ही ओढ नवीन वर्षात अधिक प्रमाणात वाढत जाण्याची चिन्हे आहेत. त्यात गतवर्षी माझ्या नवऱ्याची बायको, सुंदरा मनामध्ये भरली या मालिकांच्या शुटींगने इतरांनादेखील नाशिककडे वळण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच गोदावरी, सेतू चित्रपटांचे शुटींगदेखील करण्यात आले. त्याशिवाय नुकत्याच सुरु झालेल्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेचेही काही चित्रीकरण नाशिक परिसरात झाले आहे. तसेच धक धक गर्ल माधुरी दीक्षित हिच्या बी अ ॲक्ट्रेस या वेबसिरीजचेही काही चित्रीकरण नाशकात झाले. तसेच आमीर खानदेखील त्याच्या चित्रपटासाठीचा काही भाग नाशकात चित्रीत करुन गेल्याने वेबसिरीज, मालिकावाल्यांना नवीन वर्षात देखील नाशिकचे मोठेच आकर्षण राहण्याची चिन्हे दिसत आहेत.