नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्रासपणे बेकायदेशीर दारूविक्री सुरू असून, यामुळे गावागावांतील शांततामय वातावरण धोक्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे मद्यविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली असून, याबाबत ‘आप’ने राज्य उत्पादन शुल्क विभागाला निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील अनेक गावांत खुलेआम दारू विक्रीमुळे मोठ्या प्रमाणात १८ वर्षांखालील युवक दारूच्या आहारी गेले आहेत. यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, गावागावांतील शांतता भंग पावली आहे. याविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांना दारू विक्रेत्यांपासून धोका निर्माण झाला आहे. यासाठी दारूबंदी करणाऱ्या महिलांना संरक्षण देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा व नियमावलीबाबत फलक लावावा, दारूबंदीसाठी संघटित झालेल्या गावकऱ्यांना संरक्षणाबरोबरच कायद्याची माहिती द्यावी, प्रत्येक दारू विक्रीच्या दुकानाबाहेर ‘मुलांना दारू विक्री करणे गुन्हा आहे’ या आशयाचा फलक लावण्यात यावा जेणेकरून २५ वर्षांखालील मुलांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होऊन दारू दुकानात येण्यास ते कचरतील यांसह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी महानगर समन्वयक जितेंद्र भावे, जिल्हा समन्वयक अॅड. प्रभाकर वायचळे, खजिनदार जगबीरसिंग, अॅड. मीनल भोसले, राजू आचार्य, विकास पाटील, एकनाथ सावळे, फातिमा आचार्य, सचिन शिंगारे, अक्षय अहिरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)