सुरगाणा : काही दिवसांपूर्वी झालेला पाऊस व त्यानंतर वातावरणातील बदलामुळे तालुक्यातील आदिवासी शेतकºयांचे भात, घेवडा, टमाट्यासह स्ट्रॉबेरी पिकांवर करपा व बुरशी पडून मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. यामुळे महागड्या औषधांची फवारणी करण्यात येत आहे. स्ट्रॉबेरीच्या रोपाला फूल व फळ येणाºया हप्त्यात करपा व बुरशी यामुळे येणारे फूल या वातावरणामुळे जळून जात आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी चिंतित आहे. रोज महागडी औषधे फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रब्बी हंगामातील नुकत्याच पेरणी केलेल्या गहू, दादर, हरभरा, मसूर, वाटाणे या पिकांना हे वातावरण चांगले आहे; मात्र स्ट्रॉबेरीला २०० ते २५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असताना स्ट्रॉबेरी रोगाच्या कचाट्यात सापडल्याने नुकसान होत आहे. तालुक्यातील बोरगाव घाटमाथा परिसरातील घोडांबे, घागबारी, सराड, उंबरपाडा, चिखली, हिरिडपाडा, खरु डे, बोरगाव, पोहळी, पासोडी, नागशेवडी, वांझुळपाडा, मोहपाडा, शिंदे व कळवण तालुक्यातील सुकापूर, खिराड, मोहपाडा, लिंगामे, आमदर, देवळीकराड, शृंगारवाडी, बापखेडा, शेपूपाडा, ततानी, दरेगाव, दळवट परिसरात स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. या परिसरातील हे नगदी पीक आहे. कमी जागेत जास्त उत्पन्न तसेच स्ट्रॉबेरीला दरवर्षी २०० ते २५० रु पये प्रतिकिलो भाव मिळत असल्याने आदिवासी शेतकरी या शेतीकडे वळला आहे. ढगाळ वातावरण व धुके असेच वातावरण आणखी काही दिवस राहिल्यास स्ट्रॉबेरी शेतीचे नुकसान होण्याची भीती स्ट्रॉबेरी उत्पादक आदिवासी शेतकºयांनी व्यक्त केली आहे. अशोक लक्ष्मण भोये (सरपंच) घोडांबे, ता. सुरगाणा येथील शेतकºयाने महाबळेश्वर येथून विंटर व नाभिया जातीची ९० हजारांची स्ट्रॉबेरीची ३० हजार रोपे लावली. अवकाळी पाऊस पडल्यापासून रोज महागडी औषधे फवारणी करूनही करपा व बुरशी रोग आटोक्यात येत नसल्याने निसर्गाच्या अवकृपेने झालेले नुकसान बघता कृषी विभागाने पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
सुरगाण्यात वातावरणातील बदलामुळे स्ट्रॉबेरीवर करपा, बुरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:51 PM