नाशिक : कोरोना आजाराचे थैमान रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. लॉकडाउनची मुदत रविवारी (दि.१७) संपली असली तरी राज्य सरकारकडून पुन्हा ३१ मेपर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. शहर आयुक्तालय व पोलीस अधीक्षक ग्रामीण यांच्या हद्दीत पुन्हा भादंवि कलम १४४ सोमवारी (दि.१८) दुपारी १ वाजेपासून लागू होणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केली.सोमवारपासून शहरासह जिल्ह्यात सर्वच पोलीस ठाण्यांकडून धडक कारवाई केली जाणार आहे. लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकावर बंधनकारक तर आहेच, मात्र ते आपले कर्तव्यदेखील आहे हे विसरू नये, असे मांढरे म्हणाले. जमावबंदी, संचारबंदी कायम राहणार असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त तसेच पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहेत.या यंत्रणेवर मात्र दिवसेंदिवस ताण वाढतच आहे. कोरोना आजाराला रोखण्यासाठी लॉकडाउन सातत्याने पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.मालेगावसह शहर, ग्रामीण भागातदेखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. आयुक्तालयाच्या हद्दीत कोरोनाबाधितांचा आकडा ४६वर पोहोचला आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनसह शासनाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे तरच कोरोनाची साखळी तोडणे शक्य होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनीही स्पष्ट केले आहे.ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच दहा वर्षांखालील बालकांनी घरांमध्येच राहण्यास अधिकाधिक प्राधान्य द्यावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे. शहरासह जिल्ह्यात अपवादात्मक स्थितीत विवाहसाठी ५० तर अंत्यविधीकरिता जास्तीत जास्त २० लोकांना सर्व नियमांचे पालन करत एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे.----------------------------------प्रशासनाकडून नागरिकांसाठी नियमावलीभाजीपाला, दूध, किराणा विक्री-खरेदी जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेतच करता येणार आहे. किरकोळ दूधविक्री सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. यावेळी नागरिकांनी बाहेर पडताना ‘डिस्टन्स’ ठेवणे, तोंडाला मास्क बांधणे, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, मद्यपानासह थुंकणे टाळावे.
३१ मेपर्यंत जमावबंदी पुन्हा लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 10:16 PM