लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : देशात एनआरसी व सीएबी या नवीन कायद्याने ठिकठिकाणी आंदोलने, मोर्चे, हिंसाचाराच्या घटना घडत असून, हा हिंसाचार का होतोय, तो घडविण्यामागची प्रेरणा कोणाची आहे, याची चौकशी झाली पाहिजे. सध्या देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती अराजकता माजविणारी व देशाला विभाजनाकडे नेणारी असल्याचे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना खासदार राऊत यांनी, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ३० तारखेला दुपारी बारा ते एक वाजेच्या दरम्यान होणार असून, आता त्यात कोणताही बदल होणार नाही. कोणत्याही खात्यासंदर्भात कोणत्याही पक्षाचे घोडे अडलेले नाही. खातेवाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत आणि खातेवाटप करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे कोणा एका पक्षामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला अथवा खातेवाटपामुळे विलंब होतो या चर्चेत तथ्य नसून, शेवटी कोणालाही कोणतेही खाते दिले तरी, त्या खात्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात, असे सांगून राऊत यांनी सूचक इशारा दिला. पुणे येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या कामकाजाबाबत कौतुक केले त्याबाबत पत्रकारांनी राऊत यांना छेडले असता ते म्हणाले, यापूर्वी मी शरद पवार यांच्याबद्दल बोलत होतो, आता उद्धव ठाकरे बोलत आहेत, त्यांचे स्वागत आहे. परंतु शरद पवार काय आहेत हे मी जेव्हा सांगत होतो तेव्हा लोक माझ्याकडे भुवया उंचावून पहात होते. त्यामुळे मी जी काही शरद पवार यांच्याबद्दल भूमिका मांडली होती त्याचे हे यश असल्याचेही राऊत म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले जात होते हे काही मला माहीत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. समाजात परिवर्तन घडविण्याची ताकद शरद पवार व शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्यातच होती, असे सांगून महाविकास आघाडीच्या सरकारचा रिमोट कंट्रोल शरद पवार यांच्याकडे असेल काय या प्रश्नावर राऊत यांनी रिमोट कंट्रोल फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्या हातातच शोभत होता. परंतु शरद पवार यांच्या कामाची पद्धत वेगळी असल्याचेही राऊत यांनी मोठ्या गौरवाने सांगितले.