नाशिक : शहराचे सुरू असलेले महानगरीकरण आणि त्यात कोरोना काळात अनेकांच्या जगण्याचेच प्रश्न अवघड झाले आहेत. अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना समाजाने कधीही केला नव्हता. त्यामुळे सद्यस्थितीत सामाजिक स्थित्यंतर स्वरूपातील परिणाम अपरिहार्य असल्याची भावना सनदी लेखापाल तुषार पगार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नॅबचे पदाधिकारी मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी व्यक्त केली.
लोकमतच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त अंबडच्या मुख्य कार्यालयात झालेल्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी आणि सहायक उपाध्यक्ष बी.बी. चांडक यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना मुनशेट्टीवार यांनी नाशिकला सांस्कृतिक वारसा असला तरी एकूणातच नागरिकांच्या अभिरुचीत काळानुरूप बदल झाला असून या क्षेत्राला मिळणारा राजाश्रय आणि लोकसहभाग कमी होऊ लागल्याचे दिसते. तसेच सामाजिक कार्यासाठीची तळमळदेखील काहीशी कमी झाल्याचे मत व्यक्त केले. नाशिकच्या सर्वांगीण विकासामागे पूर्वीच्या काळी शहरातील नेत्यांनी दिलेले योगदानच कारणीभूत असल्याचेही मुनशेट्टीवार यांनी नमूद केले. यावेळी बोलताना पगार यांनी नाशिक शहराचा विकास हा नाशिकच्या गतीनेच होत असल्याचे नमूद केले. त्यामुळेच नाशिकचा विकास होतानादेखील नाशिक पुण्याच्या तुलनेत अद्यापही सुसह्य असल्याचे नमूद केले. कोरोना काळात सामान्य नागरिकांच्या जगण्याचे प्रश्न बिकट झाले असल्याने त्यांना अन्य कोणत्याही प्रश्नांचा विचारच करता येण्यासारखी स्थिती नाही. सध्याच्या स्थितीत प्रत्येक नागरिकाकडून स्वत:ला आणि कुटुंबाच्या जीवितरक्षणाला प्राधान्य दिले जात असून ते कटू असले तरी हेच वास्तव आहे. त्यातही कोरोना काळात सर्वाधिक झळ ही हातावर पोट असणाऱ्यांना तसेच निम्न मध्यमवर्गीयांना सोसावी लागली आहे. गोरगरिबांना निदान शासकीय योजना, अन्न, धान्याचा तरी काही लाभ मिळू शकला. मात्र, निम्न मध्यमवर्गातील किंवा ज्या घरातील कमावत्या व्यक्तीचेच निधन झाले अशा कुटुंबांची अवस्था सर्वाधिक बिकट झाल्याची भावना पगार यांनी बोलून दाखवली. कोरोना काळात सामाजिक दरी खूप वाढल्याचेही अनुभव समाजातील संवेदनशील व्यक्तींना जागोजागी दिसून आल्याचेही पगार यांनी नमूद केले.
इन्फो
कोरोनाचे परिणाम भविष्यातही दिसणार
कोरोनाच्या या दोन्ही लाटा हे समाजाला आलेले खूप मोठे आजारपण आहे. कोणत्याही मोठ्या आजारपणानंतर आपल्याला खूप अशक्तपणा येतो. त्याप्रमाणेच कोरोनामुळे समाजाच्या सर्व घटक आणि क्षेत्रांवर भविष्यात अधिक भयानक परिणाम दिसून येण्याची शक्यता असल्याचा सूरदेखील यावेळी व्यक्त करण्यात आला.
फोटो
११० किंवा १११