देवळा : जुलै महिन्याचा पंधरवडा उलटत आला, परंतु अद्यापही जून महिन्याची पेन्शन खात्यावर वर्ग न झाल्यामुळे संतप्त झालेल्या तालुक्यातील पेन्शनरांनी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना पाठविण्यात आली आहे.
देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू करण्यात आली. यामुळे शहरात बडोदा बँकेच्या (तत्कालीन देना बँक) शाखेवरील कामाचा भार कमी होऊन ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु या तिन्ही शाखांपैकी बडोदा बँकेत ग्राहकांशी उर्मट वर्तणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांविषयी ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी आहेत. रांगेत ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यक्रम द्यावा, अशी मागणी प्रा. आर. के. पवार, कृष्णा बच्छाव, निंबाजी आहेर, आर. के. आहिरराव आदी पेन्शनधारकांनी निवेदनात केली आहे. निवेदनाची प्रत नाशिक कोषागार कार्यालय व बँक ऑफ बडोदा शाखा देवळा यांना देण्यात आली आहे.
---------------------
बडोदा बँकेने आयएफसी कोड व वेतनधारकांचे नवीन खाते नंबर पाठविण्यास उशीर केल्यामुळे मे महिन्याचे वेतन खूपच उशिरा मिळाले होते. बँकेत पेन्शन आल्यावर देखील सात ते आठ दिवस पैसे खात्यावर वर्ग केले जात नाहीत. पैशाच्या बंडलमध्ये नोटा कमी निघाल्याच्या पेन्शनरांच्या तक्रारी आहेत.
_ प्रा. आर. के. पवार (सेवानिवृत्त प्राध्यापक, देवळा)
--------------
प्रत्येक महिन्यात पाच तारखेच्या आत पेन्शनरांची पेन्शन द्यावी, असे शासनाचे आदेश आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. पेन्शन कधी येईल याची निश्चित माहिती नसल्यामुळे चौकशी करण्यासाठी वारंवार बँकेत फेऱ्या माराव्या लागतात.
- कृष्णा बच्छाव, सेवानिवृत्त शिक्षक, देवळा
-----------------
बहुतेक पेन्शनर व्यक्तींना विविध शारीरिक व्याधी जडलेल्या आहेत. त्यासाठी सातत्याने व नियमितपणे वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. यासाठी दरमहा मिळणाऱ्या पेन्शनमधील ठराविक रक्कम औषधोपचारासाठी खर्च करावी लागते. परंतु पेन्शन मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे या ज्येष्ठ व्यक्तींना पैशाअभावी औषधोपचार थांबविण्याची वेळ आली आहे.
- निंबाजी आहेर, सदस्य, तालुका पेन्शनर्स संघटना
---------------------
बॅंक ऑफ बडोदाच्या देवळा शाखेत कॅश काउंटरजवळ ज्येष्ठ नागरिकांसह ग्राहकांची झालेली गर्दी.
(०९ देवळा)
090721\09nsk_9_09072021_13.jpg
०९ देवळा