नाशिक : देशातील शैक्षणिक अभ्यासक्रमातून शेतकऱ्यांना प्रतिष्ठा मिळत नाही, त्यामुळेच हा व्यवसाय दिवसेंदिवस रसातळाला जात असल्याने शेतकरी आत्महत्त्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सन्मान आणि प्रतिष्ठा देणाऱ्या चिकित्सक अभ्यासक्रमाची निर्मिती आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा ज्योतीराव फुले इतिहास अकादमीचे अध्यक्ष श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी केले.नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को-आॅपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीतर्फे येथील रावसाहेब थोरात सभागृहात मंगळवारी (दि.१७) आयोजित गुणवत्ता पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनडीएसटीचे अध्यक्ष राजेंद्र निकम, आमदार सुधीर तांबे, सीमा हिरे, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष फिरोज बादशाह उपस्थित होते. सुरुवातीला भगवान पाचोरे यांनी हास्यविनोदी कार्यक्रम सादर केले. त्यानंतर उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कोकाटे यांनी शैक्षणिक अभ्यासक्रमाची चिकित्सा होण्याची आवश्यकता व्यक्त केली. ज्योतिशास्त्रावर खरमरीत टीका करताना अंधश्रद्धेचे अनुकरण करणाऱ्यांचे वाभाडे काढले. नावाच्या अध्याक्षरावरून जर रास ठरते, तर एकट रास असलेल्या महापुरुषांमध्ये संघर्ष होण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच स्त्री शिक्षणावर भाष्य करताना शैक्षणिक अभ्यासक्रमातील इतिहास विषयात स्त्रीयांच्या इतिहासाला समान स्थान देण्याचा आग्रह त्यांनी केला. इतिहासात स्त्रीयांना समान स्थान दिले गेले तर पुढच्या पिढीला त्यातून मार्गदर्शन मिळून आजच्या काळात स्त्रीयांना समान हक्कासाठी झगडावे लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, या कार्यक्रमात एकूण ६६ शिक्षकांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यात जिल्ह्यातील एकूण १६ आदर्श शिक्षकांना वक्तृत्व, स्काउट-गाइड, क्रीडा, समाज प्रबोधन, साहित्य निर्मि$$$$ती, विरसामुंडा, चित्रकला, राजकीय, रा. गो. कुंठे गणित व राज्य पुरस्कार आदि पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच जिल्हातील विविध तालुक्यातील शाळांमधील एक मुख्याध्यापक, एक शिक्षक व एक शिक्षकेत्तर कर्मचारी असे तीन पुरस्कार देण्यात आले. (प्रतिनिधी)
अभ्यासक्रम चिकित्सेची गरज
By admin | Published: January 17, 2016 10:55 PM