विजय मोरे नाशिकसमाजातील सर्वार्थाने नडलेला, पिडलेला आणि उपेक्षित घटक म्हणून ग्राहकांकडे पाहिले जाते. त्यामुळे अनेकदा फसवणूक झाली, तरी तो शांत बसतो, असा पूर्वी समज होता़ मात्र, ग्राहक आता आपल्या अधिकारांप्रती चांगलेच जागरूक झाल्याचे नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमध्ये दाखल प्रकरणांच्या आकडेवारीवरून दिसून येते़ गत साडेचार वर्षांची आकडेवारी पाहता दोन हजार १७९ ग्राहकांनी तक्रारी केल्या़ विशेष म्हणजे त्यापैकी एक हजार ३३६ ग्राहकांच्या प्रकरणांवर सुनावणी होऊन ती निकालीही निघाली आहेत़ देशभरात विविध कंपन्यांच्या नावे जादा व्याजाचे, पैशांची आमिषे दाखवून गुंतवणुकीच्या योजनांचा प्रचार केला जातो़ यास भुलून वा आमिषाला बळी पडून सर्वसामान्यांची अक्षरश: लूट होते़ तर बँक, वैद्यकीय उपचार, टेलिफोन, विमा कंपन्या, बिल्डर, विद्युत पुरवठा करणारी सरकारी कंपनी, विमानसेवा, रेल्वे यांच्याकडून नागरिकांचे अर्थात ग्राहकांचे हक्क डावलून आर्थिक पिळवणूक केल्याचे प्रकार घडलेले आहेत़ अशा ग्राहकांच्या हक्कासाठी शासनाने २४ डिसेंबर १९८६ ला ग्राहक संरक्षण कायदा केला़नाशिकच्या ग्राहक न्यायालयामध्ये दरवर्षी दाखल होणाऱ्या प्रकरणांमध्ये वाढ होत चालली असून प्रकरणे निकाली निघल्याचे प्रमाणही चांगले आहे़ विशेष म्हणजे बिल्डरकडून फ्लॅट किंवा घर खरेदी केल्यानंतर ठरलेल्या मुदतीत ताबा न देणे, ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र न देणे, ठरलेल्या रकमेच्या २० टक्के रक्कम मिळाल्यानंतरही लेखी करार करण्यास नकार देणाऱ्या शहरातील काही नामांकित बिल्डरांना ग्राहक न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद सोनवणे यांनी दोन वर्षे कारावास तसेच आर्थिक दंडाच्या शिक्षाही सुनावल्या आहेत़ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (ग्राहक न्यायालय) सुरू करण्यात आली आहेत़ या न्यायालयांमध्ये तक्रार करण्याची सोपी पद्धत, प्रकरणावर जलद व ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवून दिला जाणारा न्याय यामुळे या तक्रारींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे़
ग्राहक झाले जागे
By admin | Published: October 06, 2016 1:13 AM