लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महावितरणचे कर्मचारी वेळेत वीज मीटर्सचे वाचन करीत नाही आणि वेळेत बिलांचा बटवडा करीत नाही, त्यामुळे शहरातील लाखो वीज ग्राहकांना विलंब शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. वेळेत मीटर रिडिंग न झाल्याने जादा यूनिटचा स्लॅब बदलला जातो आणि त्यामुळे अव्वाच्या सव्वा बिले नागरिकांना भरावी लागत आहे. त्यातच यंदा मोठ्या प्रमाणात वीज अधिभार लावल्याने नागरिकांना बिल करणे अवघड झाले आहे. महावितरणच्या वतीने दर महिन्याला वीज बिलांचे रिडिंग करून घेतले जाते आणि त्यांनतर वीज बिल दिले जाते. परंतु सदरची बिले भरण्याच्या अगोदर किमान १२ दिवस अगोदर ग्राहकांकडे पोहोचली पाहिजे हा नियम आहे. परंतु बहुतांशी भागात वेळेत वीज बिलाचे रिडिंग घेतले जात नाही, त्यामुळे विहित वेळेत त्याचा बटवडा केला जात नाही. इंदिरानगर, द्वारका, पंचवटी, सातपूर, पारिजातनगरसह अनेक भागांत वीज वितरणाची मुदत संपल्यानंतर देयके मिळतात परिणामी देयक मिळाल्यानंतर तत्काळ वीज बिल भरण्यामुळे जी सवलत मिळणार असते ती तर मिळत नाही, उलटत विलंब शुल्काचा भुर्दंड सहन करावा लागतो. महात्मानगर, पारिजातनगर परिसरातील नागरिकांना तर शरणपूर पालिका बाजाराजवळील वीज कार्यालयात जाऊन डुप्लिकेट बिले घेऊन ती भरावी लागतात. सर्वात मोठा घोळ रिडिंगचा आहे. महावितरणने वीज बिल रिडिंगचे खासगीकरण केले असून, कंत्राटदारांकडील कर्मचारी येऊन ते घरोघर वीज मीटरचे रिडिंग घेतात. परंतु त्यांनी दर महिन्याला रिडिंग घेण्याच्या वेळेतही ते घेत नाहीत. त्यामुळे वीज बिल वापरायचे यूनिट अधिक होतात. वीज वितरणचे पहिल्या शंभर युनिटसाठी वीज दर तीन रुपये असून, त्यापुढे एक यूनिट गेले तरी हे दर दुप्पट म्हणजेच ६ रुपये ७३ पैसे होतात. तर साधारणत: शंभरपेक्षा अधिक यूनिट वापरणाऱ्या ग्राहकाचा विचार केला तर ३०० यूनिटपेक्षा अधिक यूनिटही होतात. परिणामी तीनशेपेक्षा एक यूनिट जादा झाले, तर हेच तर ९ रुपये ७० पैसे होतात परिणामी नागरिकांना शेकडो रुपयांचे अपेक्षित बिल हजार रुपयांच्या पुढे निघून जाते आणि त्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. महावितरणचे कर्मचारी वेळेत येत नसल्याने यूनिट वाढतात आणि त्याचा भुर्दंड मात्र नागरिकांना सहन करावा लागतो. म्हणजेच अशाप्रकारचे जादा यूनिट आणि वरून विलंब या दोन्हींचा भार नागरिकांच्या माथी बसत असल्याने गेल्या काही महिन्यांपासून जादा रक्कम वीज देयकापोटी अदा करावी लागत आहे.
ग्राहकांना वीज बिलांचा भुर्दंड
By admin | Published: June 19, 2017 2:03 AM