चांदवड : चांदवड - मनमाड रस्त्यावरील खड्ड्यांना जवळजवळ तीन वर्ष होत आहेत. त्यामुळे या रस्त्याने आतापर्यंत अनेक जणांचे वाढदिवस साजरे केले; मात्र रस्त्यातील खड्डे या वाढदिवसांपासून वंचित असतात याची दखल चांदवड तालुक्यातील मनसेच्या पदाधिकाºयांनी घेऊन गुरुवारी चांदवड उपजिल्हा रुग्णालयासमोर गांधीगिरी करीत ढोल-ताशाच्या गजरात खड्ड्यांचा वाढदिवस साजरा केला.यावेळी रस्त्यावर केक कापून वाढदिवस साजरा करून प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. रस्त्यावर सडारांगोळी काढून केकच्या सभोताली फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी मनसेचे नाना विसपुते, नितीन थोरे, परवेज पठाण, रवींद्र बागुल, दिगंबर राऊत व असंख्य मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर सार्वजनिक विभागाचे उपअभियंता के.बी. दंडगव्हाळ यांच्याशी या नेत्यांनी चर्चा केली व त्यांनी येत्या २० सप्टेंबरपर्यंत रस्त्याचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तर या नेत्यांनी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची रंगीत पत्रिका छापून चांदवड तालुक्यातील नागरिकांना वाटप केल्याने या खड्ड्यांच्या वाढदिवसासाठी चांगलीच गर्दी झाली होती. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
रस्त्यातील खड्डयांचा केक कापून वाढदिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 11:36 PM