-----
नाशिक : सातपूर परिसरातील शिवाजीनगर येथील फाशीचा डोंगरालगत राखीव वनात (नाशिक देवराई) अज्ञात लाकूडतोड्याने घुसखोरी करून सुमारे सहा-ते सात वर्षे वयाच्या १० ते १५ फूट उंच वाढलेल्या भारतीय प्रजातीच्या दोन वृक्षांची तोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी आपलं पर्यावरण संस्थेकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून वन विभागाकडे याबाबत तक्रार करण्यात आली आहे.
सातपूर शिवाजीनगर परिसरातील वन विभागाच्या राखीव वनात (नाशिक देवराई) वृक्षलागवड व संवर्धनाचे काम मागील सात वर्षांपासून आपलं पर्यावरण संस्थेकडून केले जात आहे. येथे सुमारे १२ ते १५ हजार भारतीय रोपांचे वृक्षांमध्ये रूपांतर करण्यासाठी अविरतपणे स्वयंसेवक झटत आहेत. येथे विविध दुर्मीळ भारतीय प्रजातींची झाडे, वेली, झुडपे वाढलेली दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुनिंब, अर्जुनसताडा, बेहडा, भोकर, करंज, कदंब, तिवस, शिवण, बेल, आवळा, पुत्रंजीवा, वावळ, बकूळ, चिंच, हळदू, ताम्हण, उंबर, कृष्णवड, भोरसाळ, धावडा, पाचुंदा, पळस अशा कितीतरी बहुउपयोगी आणि मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देणारी झाडे येथे बहरलेली दिसतात. यामागे आपलं पर्यावरण संस्थेच्या स्वयंसेवकांचे कठोर परिश्रम आहेत. अशाच बहरलेल्या झाडांपैकी एक बेहडा आणि वायळ या दोन झाडांवर अज्ञातांकडून हॅक्सा ब्लेड चालविण्यात येऊन त्यांची कत्तल करण्यात आली. यामुळे येथील वृक्षांची सुरक्षा धोक्यात सापडली आहे. वन विभागाच्या सातपूर परिमंडळाच्या कर्मचाऱ्यांनी या भागात चोख गस्त ठेवून वनक्षेत्रात वावरणाऱ्या अज्ञात संशयितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
---
फोटो nsk वर पाठविला आहे.