नांदूरशिंगोटे व परिसरात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तसेच भोजापूर धरण दुथडी भरून वाहत होते. त्यामुळे कालव्याद्वारे धरणाचे पाणी पूर्व भागात पोहोचले होते. कालव्याच्या लाभक्षेत्रात मुबलक पाऊस झाला. त्यामुळे रबी पिकांना आवर्तन देण्यासाठीची मागणी उशिराने झाली. दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी महिन्यात भोजपूर धरणातून कालव्याद्वारे रबी हंगामासाठी आवर्तन सोडण्यात येते; परंतु यावर्षी इतिहासात प्रथमच फेब्रुवारी महिन्यात आवर्तन सोडण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ४ फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती, तर सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना १२ फेब्रुवारी ही तारीख दिली होती. पाटबंधारे विभागाने मध्य साधून सोमवारी पाणी सोडले. भोजापूर धरणातून रबी हंगामासाठी पहिलेच आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन किमान वीस दिवस सुरू राहणार आहे. २०० दशलक्ष घनफूट पाण्याद्वारे ९०० हेक्टरवरील रबी पिकांना आवर्तनाचा लाभ होणार आहे. शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज भरून घेतले जात आहेत. आवर्तन सोडण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने कालव्याची पाहणी केली आहे. कालव्याच्या लाभक्षेत्रात अजूनही भूजल पातळी टिकून आहे. त्यामुळे सिंचनासाठी मर्यादित मागणी राहण्याची शक्यता आहे. रबीसाठी हे पहिलेच आवर्तन असल्याने धरणात पाणीसाठा शिल्लक राहून उन्हाळी आवर्तन देणेही शक्य होऊ शकेल. त्यादृष्टीनेही प्रशासनाचा विचार सुरू आहे.
भोजापूर धरणातून रबी हंगामासाठी आवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:14 AM