नाशिक- विठू माऊलीचा नामघोष करत हजारो वारकरी दरवर्षी वारीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरला जातात मात्र गेल्या बारा वर्षांपासून नाशिक मधून विठू माऊलीचा नामाचा गजर करत सायकलिस्ट सायकलने नाशिक ते पंढरपूर अशी वारी करतात यांनाही या वारीचा शुभारंभ आज सकाळी करण्यात आला विशेष म्हणजे या सायकलवारीमध्ये एक दिव्यांग सहभागी झाला असून तो एका पायानेच सायकल चालवून वारीमध्ये सहभागी झाला आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी पंढरपूर सायकल वारीचे आयोजन संस्थापक हरीश बैजल सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. या वर्षीचे वारीचे हे 12 वे वर्ष आहे. 300 सायकल वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामध्ये 40 महिलांचा देखील समावेश आहे. आज या सायकल वारीची सुरुवात प्रसन्नमय वातावरणात हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथून सकाळी सहा वाजता करण्यात आली. सायकल वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे, पोलीस उपआयुक्त प्रशांत बच्छाव , एवरेस्ट वीर द्वारका डोखे, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिकचे सहसंचालक संजय बारकुंड, रॅम विजेते डॉ. महेंद्र महाजन हे उपस्थित होते.
नाशिक सायकलिस्टस् फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे, माजी अध्यक्ष विशाल उगले, प्रवीण कुमार खाबिया, राजेंद्र वानखेडे, किशोर माने, उपाध्यक्ष अरुण पवार, डॉ. मनिषा रौंदळ, सचिव संजय पवार, संचालक , दीपक भोसले , एस पी आहेर,प्रवीण कोकाटे,माधुरी गडाख,बजरंग कहाटे, सुरेश डोंगरे यांनी मान्यवरांचे व सर्व सायकलिस्टस् चे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. प्रत्येकाच्या कपाळी विठ्ठलाचा टिळा लावण्यात आला. ढोल ताशाच्या गजरात संपूर्ण वातावरण उत्साहवर्धक झाले. भव्य दिव्य विठ्ठल मूर्ती खुल्या जीप मध्ये ठेवण्यात आली . हा रथ संपूर्ण प्रवासात सायकलिस्टस्चा उत्साह वाढवण्यासाठी पंढरपूर पर्यंत सोबत राहणार आहे . श्री. संत निवृत्तीनाथ महाराज मंदीर त्र्यंबकेश्वर येथे भल्या पहाटे सकाळी तीन वाजता सायकलवर नासिक सायकलिस्ट फाउंडेशन चा व वारीचा ध्वज घेऊन श्री निलेश झवर हे दर्शनासाठी पोहोचले, कुशावर्त येथे स्नान करून सकाळी गोल्फ क्लब मैदान येथे उपस्थित होते.त्यांच्यासोबत प्रभाकर मोरे व मनीष निकम यांनी देखील त्र्यंबकेश्वर पर्यंत सायकलिंग करत साथ दिली. हा विशेष ध्वज घेऊन सायकलिस्ट च्या आगमनानंतर आरतीला सुरुवात झाली.
मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल आरती झाली. त्यानंतर श्रीफळ अर्पण करून ढोल ताशाच्या गजरात, माऊली, माऊली, गजर करत हिरवा झेंडा दाखवून सायकल वारीची सुरुवात झाली. रिमझिम पाऊसाची सुरुवात झाल्यामुळे उत्साहात अधिकच भर पडली. आकर्षक तिरंगा रंगाच्या फुग्याची कमान गेटवर सजवलेली होती. मोठ्या उर्जेने सायकल वारकरी मार्गस्थ झाले. नाशिक रोड येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या ला अभिवादन करून पुढे सिन्नर कडे मार्गस्थ झाले. या ठिकाणी मित्रमेळा परिवारातर्फे सर्वांचे स्वागत करण्यात आले. सिन्नरचा घाट पार केल्यानंतर सिन्नर सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते सायकलपटुचे स्वागत करण्यात आले. या वारीदरम्यान अमली पदार्थ मुक्त देश व्हावा यासाठी सामाजिक संदेश घेऊन ही वारी आयोजित केल्याबद्दल नाशिक सायकलिस्ट चे विशेष कौतुक केले. दिव्यांग सायकलिस्ट सुनील पवार याचा विशेष सत्कार केला. आज 160 किलोमीटर अंतर पार करण्यात येणार असून त्यानंतर अहिल्यानगर येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.