पिंपळगाव बसवंत : येथील वणी चौफुलीवर अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वार ठार झाल्याची घटना शनिवारी (दि. ५) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. सुरत-शिर्डी मार्गावरील उड्डाणपुलावरील पथदीप बंद असल्याने ठेकेदारासह टोल कंपनीवरही गुन्हा दाखल करा, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नातेवाइकांनी घेतला होता. संबंधित तपास करून योग्य ती कारवाई करण्याच्या आश्वासनानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
शनिवारी (दि.५) पहाटे साडेपाचच्या सुमारास अंबिकानगर येथील शिवराम महादू गवारे (६५) सायकलवरून जात होते. यावेळी एका अज्ञात वाहनाने गवारे यांना जोराची धडक दिली. या घटनेत गवारे यांचा जागीच मृत्यू झाला. वणी चौफुली परिसरात सुरत-शिर्डी मार्गाचे काम सुरू आहे. दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू असलेल्या कामामुळे सातत्याने अपघात होत आहेत. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे वेळोवेळी करूनसुद्धा संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण केलेले नाही. त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील महिन्यात एका लहान मुलीला ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेत पाय गमवावे लागले. मुलीचे पाय गेल्याने तणावात असलेल्या वडिलांचादेखील अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर वेळोवेळी संबंधित ठेकेदाराला लवकरात लवकर त्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे सांगूनही ठेकेदाराने गांभीर्याने घेतले नाही. परिणामी, शनिवारी अंबिकानगर येथील गवारे यांना प्राण गमवावे लागले. तसेच वणी चौफुलीवरील उड्डाणपुलावरील पथदीप गेल्या दीड महिन्यापासून बंद असल्याने या सर्व अपघातांना टोल नाका प्रशासन व सुरत-शिर्डी मार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाइकांनी घेतला. कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना देण्यात आले.
यावेळी गणेश गायकवाड, मनोज शेवरे, जगन्नाथ गवारे, भारत बनकर, रमेश गवळी, विजय रहिरे, श्याम शिंदे, सोपान खोडे, लखन शिंदे, माणिक वाघ, गोरख शिंदे, नंदू रहिरे, प्रकाश झुरडे, सोमनाथ रहिरे, पुंडलिक बेंडकुळे, रोशन भवर आदी उपस्थित होते.
इन्फो
कारवाईचे आश्वासन
घटनेची चौकशी करून टोल कंपनी आणि ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक पटारे यांनी दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे, हवालदार रामदास गांगुर्डे, तपास करीत आहेत.
फोटो - ०५ शिवराम गवारे
०५ पिंपळगाव ॲक्सिडेंट
टोल कंपनी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना देताना अंबिकानगर परिसरातील ग्रामस्थ.
चौकटीत शिवराम गवारे.
===Photopath===
051220\05nsk_8_05122020_13.jpg~051220\05nsk_9_05122020_13.jpg
===Caption===
फोटो - ०५ शिवराम गवारे~टोल कंपनी आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांना देताना अंबिकानगर परिसरातील ग्रामस्थ.